गेल्या अनेक वर्षांपासून आतुरतेने प्रतीक्षा लागलेल्या डोंबिवली-पनवेल ही बससेवा नुकतीच सुरू करण्यात आली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या बससेवेचा शुक्रवारी शुभारंभ केला. ही बससेवा सुरू करण्यासाठी पनवेल प्रवासी संघटना, तळोजा मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (टीएमए) आणि सिटिझन युनिटी फोरम (कफ) या संस्थेच्या प्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश आले. उशिरा का होईना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने (केडीएमटीने) या बससेवेला हिरवा कंदील दिला. या बससेवेचा फायदा पनवेलकरांसहित तळोजा औद्योगिक वसाहतीमधील हजारो कामगारांना होणार आहे.
पनवेल ते कल्याण अशी बससेवा यापूर्वीच तळोजा औद्योगिक वसाहतीच्या मार्गे केडीएमटीने सुरू केली होती. मात्र तळोजा औद्योगिक वसाहतीच्या मार्गे डोंबिवली शहर आणि डोंबिवली रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेपर्यंत पोहोचविणारी कोणतीच बससेवा पनवेलकरांना मिळत नव्हती. केडीएमटीची सुरू झालेली ही बससेवा दर चाळीस मिनिटांनी या पल्ल्यावर धावणार आहे. यासाठी प्रवाशांना ३० रुपये भाडे द्यावे लागणार आहे. प्रवाशांचा बससेवेला चांगला प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे केडीएमटीच्या उत्पन्नातही भर पडली आहे.
एनएमएमटी अंगावरचे पांघरुण कधी काढणार
तीन वर्षांपूर्वी टीएमएने नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन विभागाकडे (एनएमएमटी) पाठपुरवा केला होता. त्या वेळी तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये येण्यासाठी एनएमएमटीने ५२ क्रमांकाची बससेवा खारघरमार्गे तळोजा गावातून १०२ बटालियन आरएएफ सुरू केली. परंतु या बससेवेला सहाआसनी रिक्षाचालकांनी विरोध केला. त्यानंतर काही वर्षांनी हा प्रस्ताव केडीएमटीकडे पाठविण्यात आला. केडीएमटीने याबाबत उत्पन्नाचे स्रोत पाहून धाडसी पाऊल उचलले. पनवेल-कल्याण मार्गावर बससेवा सुरू केली. केडीएमटीची या पल्ल्यावर अविरत सेवा सुरू आहे. मात्र एनएमएमटी प्रशासन या पल्ल्यांवर बससेवा सुरू करायला तयार नाही. अजूनही आपल्या कर्मचाऱ्यांवर झालेल्या मारहाण आणि बसच्या केलेल्या मोडतोडीचे कित्ते गिरवीत अंगावर पांघरुण घेऊन बाहेरचे उत्पन्न स्रोत वाढविण्याविषयी विचार करण्यास एनएमएमटी तयार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा