खारघर स्पॅगेटी येथे रस्ता ओलांडताना पाच वर्षांमध्ये ३४ जणांचे बळी गेल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग जाग येण्याचे नाव घेत नाही. स्पॅगेटी येथे टोलनाका बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे, मात्र पादचारी पुलाचे काम अजूनही धीम्या गतीने सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे खारघर नागरिक समितीने माहितीचा अधिकार वापरून हा पादचारी पूल का रखडला याविषयी पाठपुरावा केला आहे. मात्र महसुलीमध्ये रस असलेल्या या विभागाने टोलचे काम पादचारी पुलाअगोदर सुरू केल्याने येथील प्रवाशी संतप्त झाले आहेत.
शीव-पनवेल मार्गावर खारघर स्पॅगेटी येथे अपघातपर्वण क्षेत्र आहे. पाच वर्षांत ३४ बळी आणि ३३ अपघात ही आकडेवारी खारघर नागरिक समितीच्या सदस्यांनी मिळविली आहे. रस्ता ओलांडण्याच्या या तारेवरच्या कसरतीमधून सुटका होण्यासाठी पादचारी पूल का आणि कोणाच्या सांगण्यावरुन रखडला, याचे सरकारी उत्तर द्यायला सार्वजनिक बांधकाम विभाग तयार नसल्याचे या समितीच्या वतीने सांगण्यात आले. टोल वसुलीतून मिळणारे दिवसांचे लाखो रुपयांचे महसूल बीओटी तत्त्वांवर काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीला मिळणार आहे.
लवकरच हा मार्ग खुला होणार आहे. नवीन मार्गाची रुंदी वाढल्याने आजही येथे खारघरचे प्रवासी जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडतात. सरकारला रस्ता ओलांडणाऱ्यांचे काही पडले नसल्याने टोलनाक्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पादचारी पुलाचे काम ठप्प आहे हे चित्र सरकारच्या अनास्थेचे दर्शन घडविणारे असल्याचे खारघर नागरिक समितीचे पंकज जाधव यांनी सांगितले.

Story img Loader