महिन्याला ५ कोटी रुपयांची तिकीट खरेदी करणाऱ्या पनवेल रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा प्रवास सुलभ कधी होणार हे न सुटणारे कोडे आहे. जंक्शन असलेल्या या स्थानकात एकच हमाल अधिकृतरीत्या काम करीत आहे. त्याला मदतनीस म्हणून चार हमाल आहेत, मात्र ते बेकायदा सेवा पुरवीत आहेत. त्यामुळे येथून एक्स्प्रेस पकडण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना आधार घेतल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. सरकता जिना नसलेले स्थानक, डोक्यावर पत्रे नसलेले स्थानक तसेच हमाल नसलेले स्थानक अशा या पनवेल स्थानकाचा कायापालट करण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंची कृपा कधी होणार या प्रतीक्षेत रेल्वे प्रवासी आहेत.
पनवेल रेल्वे स्थानकाचे रूपांतर टर्मिनलमध्ये होणार याचे बाजारीकरण करून अनेक विकासकांनी बांधकामातील अनेक सदनिका चढय़ा भावाने विकल्या. मात्र वर्षे उलटली तरीही पनवेलचे टर्मिनल कागदावरच आहे. सध्या सात फलाट असलेल्या रेल्वे स्थानकातून लोकलच्या २७२ फेऱ्या, मालवाहतूक करणाऱ्या ५० मालगाडय़ा व ४६ फेऱ्या या एक्स्प्रेस गाडय़ांच्या होतात. स्थानकात नवीन फलाट होण्यासाठीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डासमोर मंजुरीला पाठवला मात्र हे काम कधी सुरू होणार याचा कालावधी निश्चित नाही. हा फलाट झाल्यास पनवेल स्थानकात ८ क्रमांकाचा फलाट होईल. या फलाटामुळे कर्जत-पनवेल ही लोकल लवकरच सुरू होईल. कर्जतहून पुण्यासाठी लोणावळामार्गे जाण्याची सोय असल्याने पनवेल-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी ते मोठे सोयीचे होईल. कर्जत-पनवेल लोकलचा प्रस्ताव या आठ क्रमांकाच्या फलाटामुळे पूर्णत्वाकडे जाऊ शकलेला नाही.
रेल्वे स्थानकात सर्वाधिक हाल ज्येष्ठ नागरिक व अपंगांचे होत आहेत. सरकता जिना नसल्याने नवीन पनवेलमधील अपंग व्यक्तीला आधाराशिवाय पनवेल स्थानकात उतरता येत नाही. येथे किमान एक तरी सरकता जिना लावावा, अशी मागणी होत आहे. सरकत्या जिन्यासोबत मालवाहू रॅम्प (लहान फलाट) तयार करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. मात्र प्रत्यक्षात या प्रस्तावाला चालना मिळताना दिसत नाही असेही विश्वसनीय सूत्रांकडून समजते. फलाट क्रमांक सातवर ७० टक्के पत्रेच नाहीत. एक्स्प्रेस गाडय़ा पकडणाऱ्या प्रवाशांना त्यामुळे येथील झाडांच्या सावलीचा आधार घ्यावा लागतो. पनवेल रेल्वे स्थानकात सुरक्षेचा बोजवारा उडाला आहे. फलाटावर रेल्वे पोलिसांना असलेल्या आसनावर प्रवाशीच बसून आपली कामे करत आहेत. यामुळे हे रेल्वे स्थानक किती सुरक्षित आहे, हे यावरून स्पष्ट होते. रेल्वे स्थानकात असलेले मेटल डिटेक्टर बंद अवस्थेत असल्याने पोलिसांना प्रवाशांच्या बॅगांची तपासणी हातानेच करावी लागत आहे. रेल्वे पोलीस व जीआरपीएफचे जवान येथे तैनात केले आहेत. मात्र ते आपल्या नेमणुकीच्या ठिकाणी दिसत नाहीत. त्यामुळे कोणीही या कधीही जा, अशी येथील व्यवस्था आहे. नवीन पनवेल येथील प्रवाशांना पनवेल स्थानकात येण्यासाठी रेल्वे भुयारी मार्गाचा प्रयत्न प्रशासनाने केला होता. मात्र भुयारी मार्गात भलामोठा दगड लागल्याने रेल्वेचे हे नियोजन फसले. आता पूर्वीच्या तुलनेत गाडय़ांची संख्या लक्षात घेऊन हा दगड फोडणे शक्य नसल्याने नवीन पनवेल व पनवेलला जोडण्यासाठी पोदी येथे भुयारी मार्गाचा प्रस्ताव सिडकोकडे पाठविण्यात आला आहे. मात्र सिडको प्रशासनाने या प्रस्तावाला कोणताही प्रतिसाद दिला नसल्याने हा प्रस्ताव कागदावरच आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून नवीन पनवेलच्या रहिवाशांना अर्धा तास थांबून फाटक उघडण्याची प्रतीक्षा करून मार्गक्रमण करावे लागते.
हमालांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी
पनवेल रेल्वे स्थानकात देविदास तळेकर हे एकच अधिकृत हमाल आहेत. इतर पाच जण विनापरवाना काम करत आहेत. येथील बेकायदा हमाल हे प्रवाशांची सोय असली तरीही प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन किमान अधिकृत हमालांची संख्या तरी वाढवावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Story img Loader