पनवेल शहरात ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांसाठी कंत्राटदाराने जागोजागी रस्ते खोदून ठेवले आहेत. रस्ते खोदल्यानंतर पर्यायी रस्त्यांविषयी दिशादर्शक सूचनेचे फलक लावावेत, असा एक नियम असतो. या कामांमुळे होणाऱ्या त्रासाविषयी येथील नागरिकांची दिलगिरी मागणारी पाटी लावावी किंवा बदललेल्या मार्गाचे दिशादर्शक लावण्याची तसदीही नगरपालिका किंवा संबंधित ठेकेदाराकडून घेण्यात आलेली नाही. त्यामुळे काम सुरू असलेल्या मार्गावरून जाणाऱ्या पनवेलकरांना अर्धा रस्ता चालून गेल्यानंतर पुन्हा परतीची वाट धरावी लागते.
गार्डन हॉटेल येथून शहरामध्ये शिरण्यासाठी प्रवेशद्वार आहे. येथील स्वामी नित्यानंद मार्ग थेट नगरपालिकेकडे जाणाऱ्या मार्गाकडे जोडला जातो. येथे मोठय़ा प्रमाणात रस्त्यांसाठी खोदकामे सूरू आहेत. कंत्राटदाराने या मार्गावरून येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्गाचा एकही फलक येथे झळकविला नाही. हीच अवस्था शहरात जेथे रस्त्यांची कामे सुरु आहे, तिथली आहे. एकेकाळी खड्डय़ांचे शहर म्हणून पनवेलची ओळख असायची. हे चित्र बदलावे यासाठी नगरपालिकेने गेल्या काही वर्षांपासून या भागात मोठय़ा प्रमाणावर रस्त्यांची कामे सुरू केली आहेत. मात्र, ही कामे करताना पुरेसे नियोजन नसल्यामुळे नागरिकांच्या त्रासात भर पडत आहे. पनवेल शहराची मूळ रचना अतिशय निमुळती आहे. त्यामुळे रस्त्यांची कामे करत असताना वाहन चालकांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था असणे गरजेचे आहे.
मात्र, ही कामे करत असताना पर्यायी मार्ग कोणता, याची कोणतीही सूचना नागरिकांना दिली जात नाही. कोणतीही विकासकामे करताना नागरिकांच्या येण्याजाण्याच्या मार्गाला अडथळा येत असेल तर दिलगिरीचे फलक झळकविण्याची एक प्रथा आहे. पर्याय मार्गाचे फलक लावावेत, असा नियम आहे.
मात्र, पनवेलमधील कंत्राटदार हे नियम पायदळी तुडवीत असल्याचे जागोजागी पाहावयास मिळते. त्यामुळे अर्धवट रस्त्यावरून पायपीट केल्यानंतर पुन्हा माघारी फिरावे लागत असल्याने पनवेलकर कंत्राटदार आणि नगरपालिकेच्या नावाने खडे फोडत असल्याचे चित्र दिसत आहे.
रस्त्यांच्या कामांमुळे पनवेलकर हैराण
पनवेल शहरात ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांसाठी कंत्राटदाराने जागोजागी रस्ते खोदून ठेवले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-02-2014 at 07:17 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panvel residentals agitated by road work