वाहनांचे सक्षमता (फिटनेस) प्रमाणपत्र देण्यासाठी ठाणे, वडाळा आरटीओला बंदी घालण्याचा इशारा उच्च न्यायालयाने दिला असला तरी या यादीतून पनवेल आरटीओला वगळण्यात आले आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी  पनवेल आरटीओने पुढाकार घेऊन राज्यातील पहिले खासगी तत्त्वांवर वाहनांचे चाचणी करणारे केंद्र सुरू केले होते. या केंद्रामुळे न्यायालयाचा दणका पनवेल आरटीओला बसला नाही, अशी चर्चा आता रंगली आहे.
 खासगी तत्त्वांवर सुरू केलेल्या या केंद्राला वाहतूकदार संघटनेचा विरोध झाला. मात्र आठ वर्षे जुन्या वाहनांची या केंद्रातून फिटनेस तपासणी करावी असा सुवर्णमध्य काढण्यात आला. पनवेल-उरण मार्गावर कावेरी टायर्स या नावाने हे फिटनेस केंद्र सुरू आहे. सुमारे दोन वर्षांच्या कालावधीत या केंद्रातून चार हजार वाहनांची फिटनेस तपासणी करण्यात आली आहे. तरीही अजून ८० टक्के  वाहने यंत्र फिटनेसविना रस्त्यावर धावताहेत.
वर्षांला सुमारे तीस हजार वाहने पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयात फिटनेससाठी येतात. मात्र यापैकी ८० टक्केवाहनांनी आरटीओच्या अत्यावश्यक फिटनेस नियमाला बगल दिली आहे. वाहतूकदार संघटनेच्या विरोधानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आठ वर्षे जुन्या वाहनांना या फिटनेस केंद्रात पाठविण्याचा नियम काढला. टेम्पोला ७०० रुपये आणि ट्रक, ट्रेलर, बसला ९०० रुपये असा खर्च येथे वाहनमालक फिटनेससाठी करतात. जर्मनी देशातील स्नॅपऑन या कंपनीची यंत्र या केंद्रात अवघ्या दहा मिनिटांमध्ये एका वाहनांची लाइट आणि ब्रेक, टायर, इंजिन प्रदूषणाची तपासणी करतात.
या अगोदर फिटनेससाठी आलेल्या वाहनांची आरटीओ अधिकारी तपासणी करताना कोणत्याही यंत्राची सोय नव्हती. मोटार निरीक्षक हे डोळ्यांनी दिसणाऱ्या वस्तुस्थितीवर वाहनांना फिटनेस देत असत. वाहन किमान ३ वर्षे जुने झाल्यानंतर अशी तपासणी व्हावी, वाहन आणि रस्ता सुरक्षा विभागाचे अभियान चालविणाऱ्या तज्ज्ञांची ओरड होती.  पनवेलमध्ये यांत्रिक फिटनेस तपासणी सुरू केल्यानंतर वाहतूकदार संघटनांचा आरटीओच्या धोरणांना विरोध झाला. आरटीओच्या शुल्कात वाहनांची यांत्रिक फिटनेस काढून दिल्यास वाहनमालकांना आर्थिक सोयीचे ठरेल, असे ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पैठणकर यांनी सांगितले.
पनवेल-उरण परिसरात जेएनपीटी बंदर, स्टीलबाजार, औद्योगिक वसाहतींमुळे येथे अवजड वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. या परिसरातील बस गाडय़ांची संख्या कमी असल्याने या केंद्रात दोन वर्षांत ५० बसगाडय़ा फिटनेससाठी आल्याची नोंद आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसची फिटनेस तपासणी या केंद्रामध्ये अनिवार्य व्हावी आणि तीन वर्षे जुन्या वाहनांची चाचणी करण्यात यावी, असे परिवहन तज्ज्ञांचे मत आहे.