महिन्याला दोन कोटींचे उत्पन्न असलेल्या पनवेलच्या एसटी आगारामध्ये पायी चालणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेविषयी साशंकता निर्माण झाली आहे. प्रत्येक महिन्याला एक या सरासरीने डेपोमधून चालणाऱ्या प्रवाशांना एसटीच्या खाली चिरडण्याचे काम सुरू आहे. १५ दिवसांपूर्वी घडलेल्या अपघातामधून कोणतीही शिकवण न घेतल्याने ६ नोव्हेंबरला अजून एका वृद्धाला आपले प्राण गमवावे लागले. अपघातामध्ये मृत व्यक्तीचे नाव तपोवन अॅन्थोनी डेव्हीज असे आहे. एसटी महामंडळाच्या कारभारामध्ये अपघातानंतर निलंबन व वाहतूक प्रशिक्षणाची सोय आहे. मात्र हेच प्रशिक्षण अपघातापूर्वी चालकांना मिळाल्यास रस्त्यावरचे व आगारातले सर्व अपघात टळले असते.
६ नोव्हेंबरला रात्री साडेदहा वाजता कल्याण-पनवेल या पल्ल्याच्या गाडीतून डेव्हीज एसटीमधून उतरत असतानाच बसच्या चाकाखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत पनवेल डेपोचे नियंत्रक यांनी पोलिसांना दोन तासांनी उशिरा ही माहिती कळवली. तसेच डेव्हीज ज्या बसमधून उतरले त्याच बसच्या चाकाखाली ते कसे आले याचा तपास पोलीस उपनिरीक्षक बी. एल. गव्हाणे हे करीत आहेत. डेव्हीज हे एमएसईबीमध्ये कार्यकारी अभियंतापदावरून नुकतेच सेवानिवृत्त झाले होते. ते विचुंबे येथे राहत होते. पोलिसांनी याप्रकरणी संबंधित बसचालक अजिनाथ गराडे याला हलगर्जीपणाने बस चालविल्यामुळे अटक केली होती. न्यायालयाने गराडे याला न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे. मात्र हा अपघात घडला त्यावेळी एकही बस संबंधित बसच्या शेजारी उभी नव्हती तरीही हा अपघात कसा घडला, याबद्दल पोलीस व डेपोमधील चालकांमध्ये साशंकता आहे.
पनवेल डेपोमध्ये ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात लक्ष्मीबाई करके या बसमधून उतरून स्वच्छतागृहाकडे जाताना त्यांना बसने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून डेपो व्यवस्थापकांनी चालक व वाहकांसाठी वाहतूक नियमनाचे प्रशिक्षण घेतले असते, तर आज डेव्हीज यांचे प्राण वाचले असते, असे येथील प्रवासी सांगतात. अपघातानंतर संबंधित चालकाला १० दिवसांसाठी निलंबन करून, त्यानंतर त्याला वाहतूक प्रशिक्षणाची तरतूद एसटी महामंडळाच्या नियमात आहे. त्यानुसार कारवाई होणार आहे. ६ नोव्हेंबर रोजी झालेल्या अपघातामध्ये तपोवन यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर तेथून पोलिसांना कळवण्यात आले. त्यामुळे पोलिसांना कळविण्यात कोणीही दिरंगाई केलेली नसल्याची माहिती पनवेल आगार व्यवस्थापक आर. जी. परदेशी यांनी दिली आहे.
पनवेल एसटी आगार अनास्थेचा दुसरा बळी
महिन्याला दोन कोटींचे उत्पन्न असलेल्या पनवेलच्या एसटी आगारामध्ये पायी चालणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेविषयी साशंकता निर्माण झाली आहे.
First published on: 11-11-2014 at 06:23 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panvel st agar