पनवेल एसटी डेपोच्या दुरवस्थेची व्यथा गेल्या दोन वर्षांपासून संपण्याचे नाव घेत नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे परिवहन विभाग आहे. मात्र याच विभागामध्ये पनवेल एसटी डेपोच्या नवीन बांधकामाची फाइल गेल्या दोन वर्षांपासून मंजुरीविना पडून असल्याचे परिवहन विभागाच्या पनवेल डेपोकडून सांगण्यात आले. दिवसाला पनवेल डेपोमध्ये हजाराहून अधिक बसगाडय़ा येतात. मात्र अनेक वर्षांपासून या डेपोची सुधारणा करण्यासाठी हालचाली कासवगतीने होताना दिसतात. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.पनवेल डेपोमधील कर्मचारी खड्डे व धुळीपासून होणाऱ्या आजारांनी जर्जर झाले आहेत.
डेपोच्या जागेवर नवीन इमारती बांधणार, येथील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण होणार, व्यापारी संकुल येणार, प्रवाशांसाठी वेटिंग रूमची अत्याधुनिक सोय होणार, हे पनवेलकरांसाठी दिव्य स्वप्न बनले आहे. बस डेपोमधील दिवसा व रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या बसण्याच्या बाकावर कुत्री, मनोरुग्ण आणि भिकारी मोठय़ा संख्येने बसलेले दिसतात. डेपोमध्ये पोलिसांसोबत परिवहन विभागाचे निरीक्षक कधी काळी वावरताना दिसतात. परंतु ते यावर र्निबध घालण्यात असमर्थ ठरले आहेत.
काही बाकांवर मानवी विष्ठा फासलेली पाहायला मिळते. अनेक ठिकाणी पंखे व विजेच्या दिव्याची कमतरता भासते. ही येथील प्रवाशांची रोजची व्यथा आहे. दोन वर्षांपूर्वी या डेपोची सुधारणा करण्यासाठी ३९ कोटी रुपयांचे काम एका कंपनीला देण्यात आले. मात्र मुख्यमंत्री चव्हाण यांनी स्वत: हस्तक्षेप करून ही निविदा प्रक्रिया थांबविली. मुख्यमंत्र्यांच्या मते पनवेल डेपोसारख्या जागेची जास्तीत जास्त किंमत प्राप्त होऊ शकते. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया पुन्हा नव्याने काढण्याचे आदेश मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिल्याचे डेपो व्यवस्थापक कार्यालयाकडून सांगण्यात आले. पुनर्निविदा प्रक्रिया जाहीर झाल्याने लोकसभेच्या निवडणुकीमधील आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया सरकारी कामाच्या कचाटय़ात सापडली. १६ मे रोजी लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर तीन महिन्यांत पुन्हा विधानसभा निवडणुका होणार आहेत. पनवेल डेपोचे प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे असल्याने यावर मार्ग कसा काढायचा यासाठी प्रशासनाने युक्ती लढविली आहे.
मंगळवारपासून पनवेल डेपोच्या प्रवेशद्वाराजवळील काँक्रीटीकरणाचे काम अल्प स्वरूपात असल्याचे दाखवून कामाची सुरुवात करण्यात आली आहे. डेपोची बीओटी तत्त्वांवर पुनर्निविदा प्रक्रिया होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाल्यास पनवेलकरांना पावसाळ्यानंतर सुंदर व स्वच्छ डेपोमधून एसटीची बस पकडायला मिळेल. एसटी डेपोमध्ये एकच बुक डेपो पनवेलच्या प्रवाशांमध्ये वाचनसंस्कृती असल्याने येथील अनेक प्रवासी डेपोमधील बुक डेपोमधून पुस्तके, कादंबरी आणि वर्तमानपत्रे विकत घेत होते. अलीकडे डेपो परिवहन व्यवस्थापनाने ही वाचनसंस्कृती मोडण्याचा विचार केला आहे. अनेक वर्षांपासून येथे तीन बुक डेपो होते. आता त्यापैकी एकच बुक डेपो सुरू आहे.   

रस्त्यांच्या रुंदीकरणामुळे पेच
पनवेलच्या डेपोची दुरुस्ती व नूतनीकरणासाठी बीओटी तत्त्वांवर काम देण्यासाठी निविदा प्रक्रिया पुनर्परीक्षणाचे काम सुरू आहे. डेपोच्या प्रवेशद्वारावर उरण गाडय़ा थांब्याजवळील काँक्रीटीकरणाचे काम आजपासून सुरू केले आहे. बुक डेपोसाठी नवीन निविदा प्रक्रिया सुरू आहे. गेल्या १४ वर्षांपासून हे बुक डेपो येथे सुरू होते. त्यामुळे नवीन दराप्रमाणे निविदा होणे गरजेचे आहे. कळंबोली मॅकडोनाल्ड हॉटेलसमोरील रस्त्यांच्या रुंदीकरणामुळे कर्मचाऱ्यांना तेथे जागाच न दिल्याने हा पेच निर्माण झाला आहे.
आर. जे. परदेशी, डेपो व्यवस्थापक, पनवेल</strong>

कळंबोली थांब्यावरील निरीक्षक चौकी अडगळीत
कळंबोली येथील मॅकडोनाल्ड हॉटेलसमोर पनवेल डेपोकडून एसटीच्या प्रवाशांसाठी एका निरीक्षक उपलब्ध केला आहे. हे निरीक्षक शिवनेरी व लांब पल्ल्याच्या बसगाडय़ांमध्ये प्रवाशांची बसण्याची सोय करतात. एसटीच्या काही गाडय़ांमध्ये यापुढे वाहकांची सोय नसते. त्या वेळी हेच निरीक्षक येथून ऑन द स्पॉट बुकिंग करून प्रवाशांची सोय करतात. मात्र रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामामुळे या निरीक्षकांसाठी दोन बाय दोनची एक चौकी एमएसआरडीसीने मार्गापासून ५० मीटरवर ठेवलेली आहे. कोणत्याही स्वच्छतागृहाची सोय नसल्याने उन्हाळ्याच्या उकाडय़ामध्ये पडवळ नावाचे हे निरीक्षक बिस्किट आणि पाण्याने आपली पोटाची भूक भागवत आहेत.

Story img Loader