पनवेल एसटी डेपोच्या दुरवस्थेची व्यथा गेल्या दोन वर्षांपासून संपण्याचे नाव घेत नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे परिवहन विभाग आहे. मात्र याच विभागामध्ये पनवेल एसटी डेपोच्या नवीन बांधकामाची फाइल गेल्या दोन वर्षांपासून मंजुरीविना पडून असल्याचे परिवहन विभागाच्या पनवेल डेपोकडून सांगण्यात आले. दिवसाला पनवेल डेपोमध्ये हजाराहून अधिक बसगाडय़ा येतात. मात्र अनेक वर्षांपासून या डेपोची सुधारणा करण्यासाठी हालचाली कासवगतीने होताना दिसतात. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.पनवेल डेपोमधील कर्मचारी खड्डे व धुळीपासून होणाऱ्या आजारांनी जर्जर झाले आहेत.
डेपोच्या जागेवर नवीन इमारती बांधणार, येथील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण होणार, व्यापारी संकुल येणार, प्रवाशांसाठी वेटिंग रूमची अत्याधुनिक सोय होणार, हे पनवेलकरांसाठी दिव्य स्वप्न बनले आहे. बस डेपोमधील दिवसा व रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या बसण्याच्या बाकावर कुत्री, मनोरुग्ण आणि भिकारी मोठय़ा संख्येने बसलेले दिसतात. डेपोमध्ये पोलिसांसोबत परिवहन विभागाचे निरीक्षक कधी काळी वावरताना दिसतात. परंतु ते यावर र्निबध घालण्यात असमर्थ ठरले आहेत.
काही बाकांवर मानवी विष्ठा फासलेली पाहायला मिळते. अनेक ठिकाणी पंखे व विजेच्या दिव्याची कमतरता भासते. ही येथील प्रवाशांची रोजची व्यथा आहे. दोन वर्षांपूर्वी या डेपोची सुधारणा करण्यासाठी ३९ कोटी रुपयांचे काम एका कंपनीला देण्यात आले. मात्र मुख्यमंत्री चव्हाण यांनी स्वत: हस्तक्षेप करून ही निविदा प्रक्रिया थांबविली. मुख्यमंत्र्यांच्या मते पनवेल डेपोसारख्या जागेची जास्तीत जास्त किंमत प्राप्त होऊ शकते. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया पुन्हा नव्याने काढण्याचे आदेश मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिल्याचे डेपो व्यवस्थापक कार्यालयाकडून सांगण्यात आले. पुनर्निविदा प्रक्रिया जाहीर झाल्याने लोकसभेच्या निवडणुकीमधील आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया सरकारी कामाच्या कचाटय़ात सापडली. १६ मे रोजी लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर तीन महिन्यांत पुन्हा विधानसभा निवडणुका होणार आहेत. पनवेल डेपोचे प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे असल्याने यावर मार्ग कसा काढायचा यासाठी प्रशासनाने युक्ती लढविली आहे.
मंगळवारपासून पनवेल डेपोच्या प्रवेशद्वाराजवळील काँक्रीटीकरणाचे काम अल्प स्वरूपात असल्याचे दाखवून कामाची सुरुवात करण्यात आली आहे. डेपोची बीओटी तत्त्वांवर पुनर्निविदा प्रक्रिया होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाल्यास पनवेलकरांना पावसाळ्यानंतर सुंदर व स्वच्छ डेपोमधून एसटीची बस पकडायला मिळेल. एसटी डेपोमध्ये एकच बुक डेपो पनवेलच्या प्रवाशांमध्ये वाचनसंस्कृती असल्याने येथील अनेक प्रवासी डेपोमधील बुक डेपोमधून पुस्तके, कादंबरी आणि वर्तमानपत्रे विकत घेत होते. अलीकडे डेपो परिवहन व्यवस्थापनाने ही वाचनसंस्कृती मोडण्याचा विचार केला आहे. अनेक वर्षांपासून येथे तीन बुक डेपो होते. आता त्यापैकी एकच बुक डेपो सुरू आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा