कोणताही गाजावाजा न करता पनवेल ते दादर (शिवाजी चौक) या मार्गावर धावणारी वातानुकूलित बससेवा नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने (एनएमएमटी) मंगळवारपासून सुरू केली. या बससेवेच्या शुभारंभामुळे या मार्गावर आता वातानुकूलित व साधी अशा दोन सेवा अध्र्या तासांच्या अंतरावर प्रवाशांना बसथांब्यावर उपलब्ध होणार आहेत.पनवेल-दादर या मार्गावर याआधी १११ क्रमांकाची वातानुकूलित बससेवा सुरू होती. वातानुकूलित बससेवा असल्याने अल्प प्रतिसादामुळे ही बससेवा बंद करावी लागली. त्यावेळी मुंबईची बेस्ट याच मार्गावर धावत होती. या स्पर्धेमुळे या बससेवेकडे प्रवाशांनी पाठ फिरवली होती. त्यानंतर हीच बससेवा पनवेल-मंत्रालय करण्याचा प्रयोग एनएमएमटीने करून पाहिला. परंतु तोही दीर्घकाळ चालला नाही. अखेर कोणत्याही शहरात न जाता महामार्गावरून थेट दादर गाठणारी बससेवा सुरू करण्याचा निर्णय एनएमएमटी व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी घेतला आहे. या मार्गावर सहा बस वातानुकूलित व इतर सहा बस साध्या असणार आहेत. सुरुवातीला दोन बसमधील अंतर हे अर्धा तास असणार आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून वेळेचे हे अंतर कमी करण्याचा एनएमएमटीचा विचार आहे. या बससेवेचा क्रमांक १०३ (वातानुकूलित) असून ४२ किलोमीटरच्या अंतिम थांब्यापर्यंतच्या बससेवेचे तिकीट ११५ रुपये आहे. याच मार्गावर सुरू असणाऱ्या साध्या बससेवेच्या अंतिम थांब्यापर्यंतचे तिकीट ३९ रुपये आहे. शुभारंभाच्या दिवशी या बससेवेला पनवेलकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. पनवेल स्थानकातून निघालेल्या साध्या बससेवेचा शेवटचा थांबा दादर हिंदमाता आहे. नवीन वातानुकूलित बसचा अंतिम थांबा दादर येथील शिवाजी चौक हा राहणार आहे. पनवेल येथून ही बस रोज सकाळी पावणेसहा वाजता सुटेल. तर दादरहून ही बस सकाळी सव्वासात वाजता सुटेल. तसेच रात्रीच्या सुमारास पनवेल स्थानकातून अखेरची बस साडेआठ वाजता व दादरहून अखेरची बस अकरा वाजता सुटेल. एनएमएमटीच्या वातानुकूलित बससेवेमधून खांदा कॉलनीपर्यंतचे तिकीट ३० रुपये, तर साध्या बसचे तिकीट ९ रुपये आहे. तिपटीहून अधिकचा तिकीट खर्च करून सामान्य प्रवासी महागडा पण सुखकर प्रवास पावसाळा व हिवाळ्यात करतील का, हा प्रश्न काही प्रवाशांना पडला आहे.
पनवेल-दादर वातानुकूलित बससेवा पुन्हा सुरू
कोणताही गाजावाजा न करता पनवेल ते दादर (शिवाजी चौक) या मार्गावर धावणारी वातानुकूलित बससेवा नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने (एनएमएमटी) मंगळवारपासून सुरू केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-09-2015 at 04:22 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panvel to dadar now ac bus service