परभणी लोकसभेची जागा काँग्रेसला सोडून द्यावी, तसेच परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर काँग्रेसच्या मंत्र्याची नेमणूक करावी, या दोन मागण्या सोमवारी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या मुंबई भेटीदरम्यान काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केल्या. उद्या (मंगळवारी) शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.
परभणीचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. प्रकाश सोळंके यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यामुळे पालकमंत्रिपद सध्या रिक्त आहे. राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांच्या समर्थक कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वीच पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाने राज्यमंत्री फौजिया खान यांची पालकमंत्रिपदी नियुक्ती करावी, अशी मागणी केली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील व परभणी मनपातील काँग्रेसच्या सर्व २६ नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली.
सन २००९पूर्वी परभणीचे पालकमंत्रिपद काँग्रेसकडे होते. आता रिक्त असलेल्या पालकमंत्रिपदावर काँग्रेसच्या मंत्र्याची नियुक्ती करावी, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली. २००४ व २००९मधील निवडणुकांच्या वेळी परभणी लोकसभेची जागा दोन्ही काँग्रेसच्या आघाडीमध्ये राष्ट्रवादीकडे आहे. परंतु त्यांना दोन्ही वेळेस पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता ही जागा काँग्रेसने सोडून घ्यावी, हे म्हणणे शिष्टमंडळाने ठाकरे यांच्यासमोर मांडले. मनपातील विरोधी पक्षनेते भगवानराव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली सर्व काँग्रेस सदस्य मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांच्या भेटीसाठी रविवारी रवाना झाले. सोमवारी ठाकरे यांची काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात भेट घेतली. आता उद्या मुख्यमंत्र्यांना हे शिष्टमंडळ भेटणार आहे. उद्याच्या शिष्टमंडळात आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचाही समावेश असेल, अशी माहिती वाघमारे यांनी दिली. सोमवारी भेटलेल्या शिष्टमंडळात मनपा सदस्य शिवाजी भरोसे, आकाश लहाने, सुनील देशमुख, श्याम खोबे, डॉ. विवेक नावंदर आदींचा समावेश होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा