राष्ट्रवादीने मंत्रिमंडळात खांदेपालट केल्यानंतर परभणीचे रिक्त झालेले पालकमंत्रिपद मात्र अजूनही रिक्तच आहे. दरम्यान, राज्यमंत्री फौजिया खान यांना पालकमंत्री करावे, अशी मागणी शिष्टमंडळाद्वारे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी करण्यात आली. खान यांना पालकमंत्रिपद मिळावे, अशी माजी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर यांची इच्छा असून वरपूडकरांनीच आपल्या समर्थकांचे शिष्टमंडळ त्यासाठी मुंबईला पाठवले होते. विशेष म्हणजे सुरुवातीला खान यांच्या पालकमंत्रिपदाला विरोध करणाऱ्या वरपूडकरांनाच आता राजकीय परिस्थितीने आश्चर्यकारक ‘यू टर्न’ घेणे भाग पाडले आहे.
परभणीचे पालकमंत्रिपद अजूनही रिक्त आहे. राष्ट्रवादीने ज्या ज्या ठिकाणचा फेरबदल केला आणि या निर्णयामुळे जेथे जेथे पालकमंत्री बदलावे लागले, तेथे तेथे आता नव्याने पालकमंत्र्यांचा पदभार देण्यात आला आहे. परभणीचा तिढा मात्र अजूनही सुटला नाही. प्रकाश सोळंके यांच्याकडे पालकमंत्रिपद जाण्याआधी खान या परभणीच्या पालकमंत्री होत्या. विशेष म्हणजे त्यांच्याकडून पालकमंत्रिपद काढून घ्यावे, यावर आमदार बाबाजानी, पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांना त्या वेळी वरपूडकरांचीही साथ होती. पण राजकारणात कोणीच कायमचे शत्रू असत नाही. कालचे मित्र असलेलेही आज शत्रूच्या भूमिकेत येऊ शकतात. ज्या खान यांच्या पालकमंत्रिपदासाठी वरपूडकरांना विरोध करावा लागला, त्याच खान यांना आता पालकमंत्री करा, अशी मागणी करण्याची वेळ वरपूडकरांवर आली आहे.
दोन दिवसांपूर्वी मुंबईत पक्षाध्यक्ष शरद पवारांना भेटलेल्या शिष्टमंडळात रामभाऊ घाटगे, धोंडिराम चव्हाण या प्रमुख कार्यकर्त्यांसह वरपूडकरांचे अन्य कार्यकत्रेही होते. या वेळी बाहेरच्या जिल्ह्यातील कोणाला पालकमंत्रिपद देण्याऐवजी परभणीला पालकमंत्रिपद द्यावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. खान यांना पालकमंत्रिपद दिल्यास आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाला त्याचा फायदा होईल, याकडे शिष्टमंडळाने लक्ष वेधले. शिष्टमंडळातील कार्यकर्त्यांच्या भावना पवारांनी जाणून घेतल्या. परंतु याच वेळी आपसात तुमच्यातले मतभेद आधी मिटवा आणि सर्वानुमते एकच निर्णय घ्या, असा सल्लाही पवारांनी शिष्टमंडळाला दिला.
राज्यात आपल्या अखत्यारीतील सर्व पालकमंत्र्यांच्या जागा राष्ट्रवादीने भरल्या, मात्र परभणीचे पालकमंत्रिपद अंतर्गत वादामुळे रिक्तच आहे. खान यांना पालकमंत्रिपद द्यावे, असा वरपूडकर समर्थकांचा आग्रह असला तरी आमदार बाबाजानी दुर्राणी, विजय भांबळे हे राष्ट्रवादीतले दोन्ही नेते त्यास अनुकूल नाहीत. पक्षाला लवकरात लवकर यासंदर्भात निर्णय घ्यावा लागणार आहे. अंतर्गत वाद मिटवून सर्वानुमते पालकमंत्रिपदाचा निर्णय व्हावा, असे पक्षाला वाटत असले तरी जिल्ह्यात तूर्त तशी स्थिती दिसत नाही. असे असले तरीही फार काळ पालकमंत्रिपद रिकामे ठेवता येणार नाही.

Story img Loader