लाखोंची गर्दी खेचणाऱ्या तुफानी सभा नि शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी परभणीने दिलेले विजयी योगदान ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी निवडीत असलेली जिल्ह्य़ाची अमीट बाब मानता येईल. लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर या दोन दशकांत त्यांच्या लाखोंच्या तीन विक्रमी सभा स्टेडियम मैदानावर झाल्या. दत्तधामजवळील मैदानावर मराठवाडा विद्यापीठ नामांतरानंतर घेतलेल्या सभेलाही अलोट गर्दी होती. सन १९८९मध्ये शिवसेना पुरस्कृत म्हणून दिवंगत अशोक देशमुख यांनी लोकसभा निवडणूक लढविली व ते विजयी झाले. या निवडणुकीच्या सहा महिने आधी बाळासाहेब ठाकरे यांची पहिली सभा स्टेडियम मैदानावर झाली. त्यानंतर दिवंगत हनुमंतराव बोबडे यांच्या प्रचारासाठी १९९०मध्ये बाळासाहेब पुन्हा परभणीत आले. ही त्यांची दुसरी सभाही विक्रमी झाली. जानेवारी १९९३मध्ये मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर झाले. नामांतराला विरोध म्हणून सभेसाठी बाळासाहेबांनी परभणीचीच निवड केली. सन १९९८मध्ये भर उन्हात बाळासाहेबांनी पोखर्णी येथे सिंगणापूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत माजी आमदार माणिकराव आंबेगावकर यांच्यासाठी सभा घेतली. सन २००४मध्ये लोकसभा व विधानसभेच्या एकत्रित निवडणूक प्रचारासाठी बाळासाहेब पुन्हा परभणीत आले. ही सभासुद्धा विक्रमी झाली. या वेळी राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने प्रसिद्द करण्यात आलेल्या ‘मराठय़ांची प्रशासन व्यवस्था’ या पुरस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असलेल्या आक्षेपार्ह मजकुराचा संदर्भ देत तत्कालीन आघाडी सरकारवर बाळासाहेबांनी टीका केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. सन २००९च्या निवडणुकीत मात्र बाळासाहेब प्रकृती अस्वास्थामुळे प्रचारासाठी परभणीत येऊ शकले नाहीत. दरम्यान, परभणीसह सेलू, गंगाखेड या ठिकाणी झालेल्या बाळासाहेबांच्या राजकीय सभाही जनतेच्या स्मरणात आहेत. तथापि शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी ज्या तांत्रिक निकषांची पूर्तता करणे आवश्यक होते ते तांत्रिक निकष परभणी लोकसभेच्या १९८९मधील विजयानेच प्राप्त झाले.
आमदार संजय जाधव – बाळासाहेबांच्या जाण्याने संपूर्ण हिंदू समाजाचेच मोठे नुकसान झाले. कधीही भरून निघणार नाही, अशी पोकळी निर्माण झाली. कोणतीही पाश्र्वभूमी नसणाऱ्या आमच्यासारख्या अनेक सामान्य कार्यकर्त्यांना बाळासाहेबांचा परिसस्पर्श झाला. बाळासाहेबांच्या पुण्याईनेच आमचे जीवन घडले.
खासदार दुधगावकर – केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे नुकसान झाले आहे. देशाच्या राजकारणात स्वत:च्या परखडपणामुळे व स्पष्ट वक्तेपणामुळे त्यांनी स्वत:चा दबदबा, दरारा निर्माण गेला. आमदार मीरा रेंगे – महाराष्ट्राच नव्हे तर देश पोरका झाला आहे. त्यांच्या जाण्याने बुलंद आवाज शांत झाला. सर्व शिवसैनिक कणखर नेतृत्वाला मुकले. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख शिवाजी दळणर, माजी आमदार हरिभाऊ लहाने, जिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव, सुधाकर खराटे आदींनीही दु:ख व्यक्त केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा