शहर महापालिकेच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांना एकत्रित पाचारण करीत महापौर व आयुक्तांनी त्यांची झाडाझडती घेतली. काही कामचुकार विभागप्रमुखांना धारेवर धरत कानउघडणी केली. महापालिका कर्मचाऱ्यांची ओळख परेड हा उपक्रम प्रथमच राबविण्यात आला. महापालिकेचे अनेक कर्मचारी पुढाऱ्यांच्या घरी राबत आहेत. नोकरी महापालिकेची व चाकरी पुढाऱ्यांची अशी महापालिकेची अवस्था आहे. महापालिकेचे कर्मचारी पुढाऱ्यांच्या घरी काम करीत असल्यामुळे अनेकदा उपलब्ध मनुष्यबळाबाबत चर्चा झाली. परंतु त्या कर्मचाऱ्यांना पुढाऱ्यांच्या घरून काढून महापालिकेच्या सेवेत आणण्याचे धाडस आजपर्यंत करण्यात आले नाही. शहरात स्वच्छता, पाणीपुरवठा या मूलभूत सुविधा देण्यात महापालिका असमर्थ ठरत आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता हे महापालिकेचे नेहमीचे रडगाणे असते. बरेच कर्मचारी पुढाऱ्यांच्या घरी काम करतात किंवा महापालिकेकडे फिरकत नाही, हे वास्तव आहे. महापौर प्रताप देशमुख, उपमहापौर सज्जुलाला, आयुक्त सुधीर शंभरकर, स्थायी समितीचे अध्यक्ष विजय जामकर यांच्यासह काही नगरसेवकांनी शुक्रवारी विविध विभागांतील कर्मचाऱ्यांना पाचारण करून त्यांच्या कामाबाबत व उपस्थितीबाबत झाडाझडती घेतली. पाणीपुरवठा, बांधकाम अभियंता, वीजपुरवठा आदी विभागप्रमुखांचीही हजेरी उपस्थित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी घेतली. स्वच्छता विभागातील काही कर्मचारी आजही ओळख परेडसाठी उपस्थित झाले नाही. त्यांच्यावर नियमानुसार कारवाई होणार आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा आदी विभागांत चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा या वेळी गौरव करण्यात आला. कामचुकार कर्मचाऱ्यांची कानउघडणी करण्यात आली. स्वच्छता विभाग, मलेरिया विभाग, विद्युत विभाग, पाणीपुरवठा विभाग, बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, अग्निशामक विभागातील कर्मचाऱ्यांची ओळखपरेड घेण्यात आली. ही बैठक रात्री उशिरापर्यंत चालू होती.