परभणी लोकसभेसाठी पाच इच्छूक उमेदवारांनी राष्ट्रवादीकडे निवडणूक लढविण्याची इच्छा प्रदर्शित केली. जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांच्यासह महापौर प्रताप देशमुख, माजी खासदार सुरेश जाधव, बाळासाहेब जामकर, डॉ. प्रफुल्ल पाटील, डॉ. विद्या पाटील यांचाही इच्छुकांत समावेश आहे. प्रदेश उपाध्यक्ष वसंत वाणी यांनी ही माहिती दिली. राज्यात राष्ट्रवादी २२ जागा लढवणार असला, तरी १५-१६ जागांवर विजय निश्चित मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
गेल्या दोन दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर विधानसभानिहाय मतदारसंघ आढावा बठका घेतल्यानंतर वाणी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार विक्रम काळे, विजय भांबळे, सुरेश जाधव, पक्षनिरीक्षक एकनाथ गवळी, डॉ. निसार देशमुख, स्वराजसिंह परिहार, डॉ. मधुसूदन केंद्रे, विजय वरपूडकर, डॉ. प्रफुल्ल पाटील आदी उपस्थित होते. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव हा विरोधी पक्षांनी केलेल्या अयोग्य प्रचारामुळे झाला. यापासून राष्ट्रवादी सावध होत पक्षाने रचनात्मक बांधणी सुरू केली आहे, असे वाणी यांनी सांगितले.
परभणीत लोकसभेसाठी जिल्हाध्यक्ष भांबळे इच्छूक असून कार्यकर्त्यांची सर्वाधिक पसंती त्यांच्या नावाला असल्याचेही वाणींनी या वेळी सांगून टाकले. परंतु असे असले, तरी महापौर देशमुख, माजी खासदार जाधव, जामकर, डॉ. पाटील, डॉ. विद्या पाटील यांनीही निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असल्याने उमेदवारीचा अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष घेतील, अशी माहिती वाणी यांनी दिली. राज्यात सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीचाच बोलबाला असल्याचेही ते म्हणाले. परभणीत राष्ट्रवादीला काँग्रेसने प्रामाणिक सहकार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पक्षाकडून सध्या संघटन आणि समन्वय साधण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात आल्याचीही माहिती वाणी यांनी दिली.

Story img Loader