जून महिना उजाडल्यानंतर बच्चे कंपनीसह पालकांना शाळा सूरू होण्याचे वेध लागले आहेत. शासकीय निकषानुसार सर्व प्राथमिक तसेच माध्यमिक शाळा १६ जून रोजी सुरू होणार असल्या तरी पूर्व प्राथमिक वर्गाच्या शाळा मात्र जूनच्या पहिल्या तसेच दुसऱ्या आठवडय़ात सुरू होत आहेत. या शाळा उघडण्याची तारीख वेगवेगळी नसल्याने पालकांमध्ये संभ्रम आहे. दुसरीकडे सुट्टीचा मनसोक्त आनंद लुटणाऱ्या बालगोपाळांना शाळा आपलीशी वाटावी यासाठी ‘शाळेचा पहिला दिवस’ हटके करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापनाकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे.
शहर परिसरातील पूर्व प्राथमिक गटातील ‘नर्सरी’, ‘ज्युनिअर केजी’ हे वर्ग काही शाळांमध्ये ६ जूनला तर काही ठिकाणी ९ तसेच १२ जून रोजी सुरू होत आहेत. शासकीय निकषानुसार सर्व शाळा १६ जून या एकाच दिवशी सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा आदेश असतांना पूर्व प्राथमिकचे वर्ग काही अंशी लवकर सुरू होत असल्याने पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. शाळा सुरू होण्याच्या या वेगवेगळ्या तारखांमुळे पालकांना नियोजित कार्यक्रम वा बाहेर जाण्याचे बेतही आवरते घ्यावे लागले. या पाश्र्वभूमीवर, शाळा सुरू होण्याआधी आवश्यक गणवेश, शिक्षण साहित्य, तसेच
 इतर साहित्य पालकांकडे सुपुर्द करण्याचे काम सुरू आहे. पूर्व प्राथमिकचे वर्ग नियोजित वेळापत्रकाआधी सुरू होत असल्याबद्दल महापालिका शिक्षण मंडळाच्या शिक्षणाधिकारी किरण कुंवर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी पूर्व प्राथमिक वर्ग हे शासनाच्यादृष्टीने संस्कार केंद्र असल्याचे नमूद केले. हे वर्ग शासनाच्या नियंत्रण कक्षेत येत नाही. त्यामुळे ते कधी सुरू करावे हा सर्वस्वी शाळा व्यवस्थापनाचा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणजे इयत्ता पहिली ते दहावीच्या शाळांना जो नियम लागू आहे, तो या वर्गासाठी लागू नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या शाळांमध्ये हे वर्ग सुरू करण्यासाठी व्यवस्थापनाने आपल्या सोईने वेगवेगळी तारीख निश्चित केल्याचे लक्षात येते. दुसरीकडे प्राथमिक शाळांमध्ये अद्याप शांतता असून काही ठिकाणी प्रवेश प्रक्रीया सुरू आहे.
शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांना आपलासा वाटावा यासाठी काही ठिकाणी साफसफाई, रंगरंगोटीच्या कामास सुरूवात झाली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी नवोगतांचे औक्षण करून स्वागत करण्यात येणार आहे. तसेच त्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके दिले जाणार आहेत.
महापालिका शिक्षण विभागाकडे कोटय़ातून मागविलेली पुस्तके प्राप्त झाली असून उर्वरीत पुस्तके १४ जूनपर्यंत येणार असल्याचे कुंवर यांनी सांगितले. ही सर्व पुस्तके संबंधित शाळांकडे रवाना करण्यात येतील. १४ ते १६ जून या कालावधीत सर्व शिक्षा अभियानाची शिक्के मारून ही पुस्तके १६ जून रोजी विद्यार्थ्यांच्या हाती पडतील यादृष्टीने नियोजन सुरू असल्याचे कुंवर यांनी सांगितले.

Story img Loader