शनिवारी दुपारी अपहरण करण्यात आलेल्या पंधरा वर्षीय शाळकरी मुलाचा त्याच्या पालकांनीच शिर्डीमध्ये अपहरणकर्त्यांसह काल (सोमवारी) रात्री शोध लावला. या गुन्ह्य़ातील आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याने अपहरण करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कुलमध्ये नवव्या इयत्तेत शिकणाऱ्या रामेश्वर नामदेव ठाणगे याचे दि. १६ मार्चला दुपारी शाळा ते बसस्थानक या दरम्यान अपहरण झाले होते. तेथे त्याची शिवराज शिवाजी शिंदे (वय २३, रा. कुसगाव ता. मावळ, जि. पुणे) याच्याशी भेट झाली़  त्यानेच रामेश्वर याला एक गोळी दिली. गोळी घेतल्यानंतर रामेश्वरला काहीच कळाले नाही. तेथून शिवराज व रामेश्वर पारनेर बसस्थानकावर आले. तेथून पारनेर-नाशिक बसने नगरला गेले. तेथे या दोघांची वाट पाहणारे आणखी दोघे उपस्थित होते. हे तिघेही रामेश्वरला घेऊन नगरच्या रेल्वेस्थानकवर गेले. तेथे रामेश्वर यास चाकूचा धाक दाखविण्यात येऊन त्यास धमकाविण्यात आले. तेथून रेल्वेने दौंड व तेथून ते पुण्यात पोहचले.
पुणे येथे पोहचल्यानंतर शिवराज याने त्याच्या एजंटला फोन करून रामेश्वर यास पुण्यात आणण्यात आल्याचे सांगितले. शिर्डीत तीस हजार रूपये पाठवित आहे, त्यास शिर्डीस घेऊन जा असे एजंटाकडून सांगण्यात आल्याने शिवराज व त्याचा एक साथीदार रामेश्वर यास घेऊन पुन्हा नगरला व तेथून बेलापूर मार्गे शिर्डीत पोहचले.
इकडे रामेश्वर घरी न परतल्याने त्याच्या आई वडिलांनी तसेच नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला होता. तो न सापडल्याने सोमवारी पारनेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. शिर्डीस जाऊन पहावे या हेतूने रामेश्वरचे वडील व करंदीचे माजी सरपंच नामदेव ठाणगे, त्यांचे सहकारी सावकार काकडे, बापूसाहेब बुगे, प्रमोद गोळे, नामदेव ठाणगे आदी बऱ्याच जणांनी शिर्डीस जाऊन शोध सुरू केला. शिर्डी संस्थानच्या सुरक्षा रक्षकांच्या मदतीने शिर्डीचा पुर्ण परिसर पिंजून काढला़  त्यातच एका ठिकाणी शिवराज व रामेश्वर फुटपाथवर झोपल्याचे आढळून आले. ओळख पटताच नामदेव ठागणे व इतर रामेश्वरला घेऊन निघाले असता तो माझा भाऊ आहे, त्यास कुठे घेऊन चाललात असा प्रश्न आरोपीने केला. त्याच वेळी शोधासाठी गेलेल्या अन्य नातेवाईकांना हा अपहरणाचा प्रकार असल्याचे लक्षात आले. तेथुनच पारनेर पोलिसांशी संपर्क साधून आरोपीसह रामेश्वरला पारनेरला आणण्यात आले.
आरोपी शिवराज यास पारनेर येथे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांच्या चौकशीत त्याने शाळकरी मुले व तरूणांचे अपहरण करणारी मोठी टोळी असल्याचे कबूल केल्याचे सांगण्यात आले. आरोपीचा एजंट शिर्डीत तीस हजार रूपये पाठविणार होता. त्या पैशातून रामेश्वर यास कपडे तसेच बुट खरेदी करण्यात येऊन मंगळवारी ते दोघे गोव्यास जाणार होते. गोव्यात रामेश्वरची विक्री करण्यात येणार होती असे आरोपीने पोलिसांना सांगितले. अपहरण केल्यानंतर अपहृत व्यक्तीच्या शरीरयष्टीनुसार त्याची पाच ते दहा लाख रूपयांपर्यत विक्री करण्यात येते अशी माहितीही आरोपीने पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी त्याच्या साथीदारांची माहिती घेतली असून या टोळीचा लवकरच पर्दाफाश करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक सुनिल शिवरकर यांनी सांगितले.