आज वाचन-संस्कृती लयाला जात आहे. पालकांच्या इंग्रजी माध्यमाच्या ओढय़ामुळे मराठीची अवहेलना होत आहे. पालकांनी पुढाकार घेऊन मराठी भाषा घरी शिकवावी. इतकेच नाही, तर पुढील पिढी मराठी भाषेचा अभिमान बाळगेल, असे संस्कार या वाचनालयातील उपक्रमांमुळे मिळावेत. त्याकरिता वाचनालयाने प्रयत्न करावा, असे मत डॉ.मंदाताई आमटे यांनी व्यक्त केले.
दीडशे वर्षांंची विकासोन्मुख वाटचाल करीत शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाचे कार्यक्रम वर्षभर घेऊन शनिवारी सार्वजनिक वाचनालयाच्या सांगता सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ.मंदा आमटे यांच्या उपस्थितीने ‘न भूतो न भविष्यती’ असा उजाळा मिळाला. या अतिथींचा साधेपणा, नम्रपणा व खरेपणा त्यांच्या प्रकट मुलाखतीमधून झळकत होता. हा सोहळा केव़ळ हृदयस्पर्शीच नाही, तर अविस्मरणीय ठरला. या सोहळ्याचे अध्यक्ष येथील सुप्रसिद्ध समाजसेवी व हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुधाकर जोशी होते.
यावेळी डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, आम्ही नगरपरिषदेच्या शाळेत शिकलो. नातवंडांना आदिवासींच्या शाळेत भरती केले. मराठीतून शिकतांना कुठेही ज्ञानात वा संस्कारात कमीपणा आला नाही. अनेकांच्या उदाहरणातून, जीवनानुभवातून शिकलो. बाबांनी आमच्यावर संस्कार केले, परंतु आपली मते लादली नाहीत. तरुणही चांगली पुस्तके आवडीने वाचतात, परंतु तशा सकस पुस्तकांची गरज आहे. या वाचनालयाच्या इतिहासात शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाचा दुर्मिळ योग आला आहे, असे स्पष्ट करीत त्यांनी वाचनालयाला शुभेच्छा प्रदान केल्या.
वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य नीळकंठ रणदिवे यांनी, डॉ. प्रकाश आमटे यांच्या पुस्तकांवर आधारित प्रकट मुलाखत घेत प्रश्नोत्तर चर्चा घडवून आणली. याप्रसंगी डॉ. प्रकाश आमटेंच्या वक्तव्यातून अनेक घटनांमागील रहस्य उलगडत गेले. प्रत्येक घटनेतून एक सूचक संदेश मिळत होता. सापाला त्रास दिला नाही तर तो उलटत नाही, परंतु माणसांबद्दल तशी हमी देता येत नाही. पोहताना भोवऱ्यात सापडलात तर घाबरू नका. दम धरला तर भोवऱ्यातून सुरक्षित बाहेर पडू शकता. अंधश्रद्धा निर्मूलन केवळ भाषणांनी होत नाही. त्याकरिता पर्याय द्यावे लागतात. तुमचा स्वार्थ नाही, हे लोकांना पटले तर, लोकअदालत यशस्वी होते. वन्यप्राणी हिंस्र होत नाहीत. ही प्रेमाची किमया आहे. चांगल्या उद्देशाने कार्य केले तर यश मिळते. क्रांतिकारक सत्तेत आले की, क्रांती पृथ्वीच्या पोटात गडप होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगता कार्यक्रमाच्या तारखेचे औचित्य साधत डॉ.सुधाकर जोशी म्हणाले, या वाचनालयाच्या भूमीचा सातबारा आमटेद्वयांच्या कार्यक्रमाकरिताच जणू होता. आमटेद्वयांच्या बोलण्यात हृदयाला भिडण्याची शक्ती जाणवली. प्रकाशदादांचा जन्म महान परंपरेत झाला. त्याच परंपरेत कार्यरत दिगंत व अनिकेत आमटे यांचा सत्कार याच सभागृहात पार पडावा. तरुणांना ते प्रेरक ठरतील. आभार कार्यकारिणी सदस्य हर्षल मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.आरती देशपांडे यांनी केले.
वाचनालयाचे अध्यक्ष धनंजय दलाल, कार्यवाह डॉ. जयंत आठवले आणि कार्यकारी मंड़ळाचे सदस्य व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सत्कारानंतर इंडियन मेडिकल असोसिएशचे अध्यक्ष डॉ.प्रदीप कुकडे, सचिव डॉ.नितीन तुरस्कर, गायनिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मधुकर धारगावे तसेच अतिथींचे सहाध्यायी डॉ.पाठक, डॉ. चौधरी, डॉ.वसुधाताई आठवले इत्यादींनी कौटुंबिक वातावरणात अतिथींचा यथोचित सत्कार केला. शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त काढलेल्या अॅड.सुधीर गुप्ते संपादित स्मरणिकेचे प्रकाशन, तसेच स्मरणिकेचे मुद्रक मुकुंदा पांढरीपांडे यांचा सत्कार डॉ.प्रकाश आमटे यांनी केला. प्रास्ताविक कार्यवाह डॉ.जयंत आठवले यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा