संगणक, दूरचित्रवाणी, व्हिडीओ गेम आदी माध्यमांतून सवंग प्रकारच्या मनोरंजनाकडे तर आपला पाल्य वळत नाही ना, याची काळजी पालकांनीच घ्यायला हवी, असा सूर बहुतांश पालक आणि शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केला. संस्कारांची रुजवणी करण्याबरोबरच वाचन आणि खेळाची गोडी लावणेही आवश्यक असल्याचे मत व्यक्त होते आहे.
नावाजलेल्या व महागडय़ा शाळेत किंवा महाविद्यालयात भरमसाट पैसे भरून प्रवेश घेतला की आपले इतिकर्तव्य संपले, अशा भ्रमात बहुतांश पालक असतात. या शाळेनेच मुलांवर शिक्षणापासून इतर सर्व संस्कार करावे, असे पालकांना वाटते. यात आपली पालक म्हणून जबाबदारी ते विसरून जात असतील तर चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया सांताक्रूझच्या राजा रामदेव पोद्दार शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव यांनी व्यक्त केली.
‘पूर्वीची मनोरंजनाची साधने आता मागे पडली आहेत. त्याऐवजी तंत्रज्ञानावर आधारलेली दूरचित्रवाणी, संगणकासारखी असंख्य आकर्षक माध्यमे मुलांना उपलब्ध आहेत. पण या माध्यमांमधील सवंग मनोरंजनाकडे मुले वळणार नाहीत याची काळजी पालकांनीच घ्यायला हवी. अशा मनोरंजनामुळे मुलांमध्ये विकृतीची भावना वाढीला लागते, म्हणूनच लहान वयातच मुलांमध्ये संस्कारांची शिंपण होणे आवश्यक आहे. हे संस्कार प्रतिगामी म्हणून मोडीत काढण्याऐवजी त्यांच्या माध्यमातून प्रेम, औदार्य, स्त्रीदाक्षिण्य, समंजसपणा आदी भावनांची रुजुवात मुलांमध्ये करण्याचा प्रयत्न पालकांनी करावा,’ असे त्यांनी सुचविले.
‘व्हिडीओ गेमला आपली हरकत नाही, मात्र हे खेळ बुद्धीला चालना देणारे किंवा एकाग्रता वाढणारे असावेत याकडे आपला कटाक्ष असतो,’ असे गोरेगावमधील एका पाच वर्षांच्या मुलाच्या पालक रुपाली कुलकर्णी सांगतात. म्हणूनच, गाडय़ांच्या शर्यती, रायफल शूटिंग आदी केवळ एकटय़ाने खेळण्याचे व्हिडीओ गेम त्या आपल्या मुलाला कधीच खेळू देत नाहीत. ‘आई-वडिलांच्या वागण्यातूनही मुले बरेच काही शिकत असतात. पालकांना वाचनाची, सामाजिक कार्याची आवड असली तर मुलेही तोच आपला आदर्श मानतात, म्हणून मुलांआधी पालकांनीही आपली वागणूक सुधारली पाहिजे,’ असा सल्ला त्या देतात.
वाचन, खेळ यांचे महत्त्व स्पष्ट करताना रुपारेल महाविद्यालयाच्या उपप्राचार्य आणि ‘समर्थ व्यायाम मंदिरा’च्या माध्यमातून खेळातही क्रियाशील असलेल्या नीता ताटके म्हणाल्या की, ‘व्हिडीओ गेममधील क्रौर्य, सतत दिसणारे रक्त याचे गंभीर आणि घातक परिणाम मुलांच्या मनावर होत असतात. एखादी घटना सतत डोळ्यांसमोर तरळत राहिल्याने मन संवेदनाशून्य होऊन मुलांना त्याचे गांभीर्यच वाटेनासे होते, पण मैदानी खेळाच्या माध्यमातून भावनांचा निचरा चांगल्या पद्धतीने होतो. सुदृढतेबरोबरच मनातील नकारात्मक भावना संपविण्याचे काम खेळ करतो, म्हणून मनोरंजनाच्या वाचन, खेळ आदी साधनांवर मुलांचा भर असावा,’ असे यांनी सुचविले.

Story img Loader