वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशातील अनियमितता आणि वाढीव फीबाबत विद्यार्थी आणि पालकांकडून नेहमीच ओरड केली जाते. मात्र विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सामान्य दर्जाच्या शिक्षणाबाबत सगळेच मूग गिळून गप्प बसतात. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना पालकांनीच आता काळजी घेण्याची वेळ आली आहे, असे महाराष्ट्र वैद्यक विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. रवी बापट यांनी सांगितले.
शिक्षण व्यापारीकरण विरोधी मंचतर्फे ‘वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील गैरव्यवहार, भ्रष्टाचार, त्रुटी आणि त्यावरील उपाय’ या विषयावर मुंबई मराठी पत्रकार संघात गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत        होते.
यावेळी शिक्षण व्यापारीकरण विरोधी मंचचे विवेक कोरडे, थाडूमल शाहानी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचे प्रा. चंद्रशेखर कुलकर्णी आदी उपस्थित होते.
वैद्यक महाविद्यालयांमध्ये आजघडीला आवश्यक शिक्षक वर्ग उपलब्ध नाही. या महाविद्यालयांतील विद्यार्थी केवळ पुस्तकातून नव्हे तर रुग्ण तपासणीतून शिक्षण घेत असतात. परंतु बहुसंख्य वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांमध्ये पुरेसे रुग्ण उपलब्ध नसतात.
विनाशिक्षक आणि विनारुग्ण अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागते. ही बाब चिंताजनक आहे, असे सांगून डॉ. रवी बापट म्हणाले की, अशीच अवस्था अभियांत्रिकी महाविद्यालयांची आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये पुरेसे अध्यापक नाहीत. १०-१२ विद्यार्थ्यांना एकत्रितपणे प्रयोग करावा लागतो. काही महाविद्यालयांमध्ये तर शिक्षकच संपूर्ण वर्गासमोर प्रयोग करून दाखवितात. दरवर्षी उत्तीर्ण होणाऱ्या अभियंत्यांमध्ये २५ टक्के तरुणांकडे नोकरीसाठी आवश्यक ते कौशल्य असते. १७ टक्के अभियंते प्रशिक्षणाद्वारे नोकरी करण्यास पात्र ठरत आहेत. तर उर्वरित ५८ टक्के अभियंत्यांचा काहीच उपयोग होत नाही, असेही ते                म्हणाले.
आपल्या पाल्याला शिशू वर्गामध्ये प्रवेश घेतला पालक फारच काळजी घेतात. परंतु वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी महाविद्यालयांत पाल्याला प्रवेश घेताना कोणतीच चौकशी  करीत नाहीत. म्हणूनच अनेक वेळा मान्यता नसलेल्या महाविद्यालयात प्रवेश घेतला जातो आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होतो, असेही ते म्हणाले.

Story img Loader