शहरातील सर्व मुख्याध्यापकांशी वैयक्तीक संपर्क, शाळांच्या सूचनाफलकावर मोठे माहितीपत्रक, किमान १ हजार जणांना मोबाईलवर एसएमएस तरीही कार्यक्रमाला उपस्थिती फक्त १५ ते २० जणांची. आता आम्ही आणखी काय करायचे?
हा उद्वेगजनक प्रश्न आहे सृजन शिक्षण, प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या कार्यकर्त्यांचा. शालेय विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन व्हावे यासाठी त्यांनी विविध क्षेत्रातील तज्ञांची एक मुलाखतमाला सुरू केली आहे. के स्क्वेअर अ‍ॅकॅडमीचे कौत्सूभ केळकर यांनी त्यासाठी त्यांना सहकार्य केले आहे. आतापर्यंत या मालेची ७ पुष्पे झाली. नवे ८ वे पुष्प आहे १३ जानेवारीला नंदकिशोर घोडके यांचे. वास्तूविशारद या क्षेत्रातील करिअरबाबत ते मार्गदर्शन करतील. शहर बँकेच्या सभागहातच ते होणार आहे. त्याला किती उपस्थिती असेल याची धाकधूक आता ८ जानेवारीपासूनच संस्थेच्या धडपणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
आपल्याला करावी लागणारी धडपड सध्याच्या मुलांना करावी लागू नये, त्यांना थोडे तरी मार्गदर्शन मिळावे या हेतूने ही मुलाखतमाला संयोजकांनी सुरू केली. सुरूवातीला तिला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, आता प्रत्येक कार्यक्रमात तो रोडावू लागला आहे. इतका की भारताचा कब्बडीचा माजी कर्णधार व नगरचाच रहिवासी असलेल्या पंकज शिरसाटच्या मुलाखतीला अवघे १० ते १२ विद्यार्थी होते.
कार्यक्रमाचे मुख्य संयोजक असलेल्या महेश घोडके, सुनिता लोंढे, पद्मजा गोखले, तेजश्री धंगेकर, भावना धर्माधिकारी हे यामुळे उद्विग्न आहेत. जिद्दीने आम्ही ही वर्षभराची मुलाखतमाला पूर्ण करूही, कारण तसे नियोजनच केले आहे, मात्र सगळे करूनही मिळालेल्या अशा प्रतिसादाने ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली नाही याची खंत मात्र मनात कायम राहील,
अशी संस्थेच्या कार्यकर्त्यांची
भावना आहे.

Story img Loader