कचऱ्याच्या ढिगांची मर्यादा ओलांडल्याने कल्याणमधील आधारवाडी क्षेपणवाडी एकीकडे बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असला तरी या ठिकाणी अवजड वाहनांसाठी सुसज्ज असे वाहनतळ उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. क्षेपणभूमीच्या जागेवर  ट्रक टर्मिनल, तसेच अवजड वाहनांसाठी वाहनतळ उभारण्याचा प्रस्ताव असून कल्याण शहर परिसरातील वाहतूक कोंडी सोडविणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे, असे पालिका आयुक्त शंकर भिसे यांनी ‘वृत्तान्तला’ला सांगितले.
महापालिकेची आर्थिक स्थिती, उत्पन्नाचे स्त्रोत, केंद्र, राज्य शासनाचा निधी यांचा ताळमेळ राखून रखडलेली विकास कामे मार्गी लावणे तसेच यापूर्वी कित्येक पटीने वाढलेले कर्जाचे दायीत्व यापुढे वाढणार नाही आणि उपलब्ध निधीतून नवीन व रखडलेले विकास प्रकल्प पुढे कसे नेता येतील याविषयी आपण सविस्तर आराखडा तयार केला आहे, असे आयुक्त भिसे यांनी सांगितले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आठ वर्षांपूर्वी आधारवाडी क्षेपणभूमीवर कचरा टाकण्यास प्रतिबंध केला आहे. या क्षेपणभूमीची क्षमता केव्हाच संपली असून तरीही याठिकाणी कचरा टाकला जात आहे. कल्याण डोंबिवली शहरात नवीन क्षेपणभूमीचा प्रश्न ऐरणीवर आला असून आधारवाडी क्षेपणभूमीवर बेकायदा पद्धतीने कचरा टाकला जात असल्याचे यापुर्वीच स्पष्ट झाले आहे. कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेला सुमारे १६ ते १८ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. आर्थिकदृष्टया हे परवडणारे नाही. त्यामुळे कल्याण, डोंबिवली परिसरातील कचरा विकेंद्रीत पध्दतीने टाकण्यात येणार आहे. यासाठी मांडा, बारावे, कोपर, उंबर्डे येथील क्षेपणभुमीच्या शास्त्रोक्त भूमीभरण आरक्षित जागेवर त्या-त्या भागातील कचरा टाकण्यात येईल, असे भिसे यांनी स्पष्ट केले. एकाच ठिकाणी कचरा टाकण्याची पध्दत बंद केली जाईल. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा मुख्य प्रकल्प उंबर्डे किंवा शासन आदेशानुसार तळोजा येथे सुरू करण्यात येईल. सहा महिन्यात हे प्रकल्प कार्यान्वीत होतील. या प्रकल्पामुळे घनकचऱ्यासाठी होणारा इंधन, गाडय़ांच्या फेऱ्या, खर्चात ५० टक्के बचत होणार आहे, असे आयुक्त भिसे यांनी सांगितले.  
ट्रक टर्मिनलची उभारणी
आधारवाडी कचराक्षेपण भूमी बंद केल्यानंतर येथील अडिच ते तीन एकर जमिनीवर ट्रक टर्मिनल तसेच वाहन तळ उभारण्याचा विचार आहे.  खासगी विकासकाच्या माध्यमातून या भागात ट्रक टर्मिनल उभारण्याचा विचार आहे. भिवंडी, नाशिक, नवी मुंबई भागातून येणाऱ्या अवजड वाहनांना येथे सुविधा उपलब्ध होईल. दिवसा शहरात जी अवजड वाहने येजा करतात ती थांबवणे वाहनतळामुळे शक्य होईल. वाहतूक कोंडीचा त्रास कमी होईल, असे भिसे यांनी स्पष्ट केले.

Story img Loader