लग्नाचा मोसम सुरू असल्यामुळे नवी मुंबईतील अनेक सभागृहांच्या बाहेर गाडय़ांची भली मोठी रांग लागल्याची दृश्ये नजरेस पडत आहेत. या सभागृहांमध्ये लग्न उत्तमरीत्या पार पडते; परंतु येथे उद्भवणाऱ्या समस्यांकडे मात्र दुर्लक्ष होते. त्यात लग्न समारंभाच्या वेळी हॉलबाहेर केली जाणारी पार्किंगची समस्या ही नवी मुंबईत गंभीर रूप धारण करू लागली आहे.
नवी मुंबईत अनेक सभागृहे असली तरी या सभागृहांना पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था नाही. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. लग्नसराईत तर हा प्रश्न गंभीर रूप धारण करतो. ऐरोलीमधील महाराष्ट्र सेवा संघ, तेरापंथ, प्रजापती, संत सावता माळी, कोपरखरणेमधील शेतकारी समाज हॉल, वाशी, सानपाडा, नेरुळ, बेलापूर येथील सभागृहामध्ये तसेच शाळेतील मैदानांमध्ये करण्यात येणाऱ्या लग्न समारंभांमुळे या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या वाहनांमुळे मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन अपघातांना निमंत्रण मिळत असते. बहुतेक सभागृहांचे बांधकाम करताना पार्किंग व्यवस्थेचा फारसा विचार केलेला नसल्याने विवाह सोहळ्यासाठी येणारे नागरिक आपली वाहने रस्त्याच्या दुतर्फा अस्ताव्यस्त पद्धतीने उभी करतात. यामुळे सभागृहाबाहेर वाहतूक कोंडी होते.
विवाह म्हटला म्हणजे वाजंत्री, फटक्यांची आतषबाजी यांची मोठी रेलचेल असते. फटके आणि वाजंत्र्यांमुळे त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना विविध समस्यांना समोरे जावे लागते. डेसिबल्सची मर्यादा ओलांडून डीजे लावण्यात येतो. त्यामुळे हृदयविकार असलेल्या तसेच आजारी नागरिकांना त्रास होतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा