* मॉल, बडय़ा संकुलांमध्ये पार्किंग क्षेत्राची चोरी
* गाडय़ांचा भार रस्त्यांवर
* एफएसआय चोरीचे प्रताप सुरुच
शहर नियोजनाचा अभाव आणि वाहनांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर होत असलेल्या वाढीमुळे मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्य़ातील प्रमुख शहरांमध्ये सध्या पुरेशा वाहनतळांचा प्रश्न अतिशय गंभीर रूप धारण करू लागला असून बिल्डर आणि नगररचना विभागातील ठरावीक अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीमुळे नव्याने उभ्या राहणाऱ्या नागरी वसाहती तसेच व्यावसायिक संकुलांमध्येही ‘पार्किंग चोरी’चे प्रकार सर्रासपणे घडू लागल्याने शहरांचे नियोजन पुरते कोलमडू लागल्याचे भयावह चित्र पुढे येऊ लागले आहे.
ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, भिवंडी यांसारख्या शहरांचा विकास होत असताना भविष्यातील पार्किंग व्यवस्थेचा खोलवर असा विचार झालाच नाही. या शहरांच्या तुलनेत नवी मुंबई हे नियोजित शहर असले तरी येथेही वाहनतळांचा प्रश्न भयावह बनला आहे. साधारणपणे ४५ ते ६० चौरस मीटर बिल्टअप क्षेत्रफळाचे घर असलेल्या इमारतीत प्रत्येक सदनिकेमागे पार्किंगची एक जागा राखीव ठेवण्याचे बंधन सध्या मोठय़ा शहरांमधील स्थानिक प्राधिकरणांनी आपल्या विकास नियंत्रण नियमावलीत टाकून घेतले आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागानेही तशा कडक सूचना या प्राधिकरणांना दिल्या आहेत. यामुळे नव्याने उभ्या राहणाऱ्या संकुलांमध्ये पार्किंगसाठी पुरेशी व्यवस्था असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. असे असले तरी पार्किंगसाठी व्यवस्था करताना आर्थिक गणिते चुकू लागल्याने काही बिल्डरांनी नगररचना विभागातील ठरावीक अधिकाऱ्यांना हाताशी धरून भोगवटा प्रमाणपत्र पदरात पाडून घेताना थेट एफएसआय चोरीचे प्रताप सुरू केल्याने या नव्या विकासाचा भारही शहरातील रस्त्यांवर येऊ लागल्याचे चित्र बऱ्याच ठिकाणी दिसू लागले आहे.
नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर उभ्या राहिलेल्या गगनचुंबी इमारतींमध्ये काही विकासकांनी पार्किंगसाठी राखीव असलेल्या जागांवर बांधकामे केल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे. एफएसआयची बिनधोकपणे चोरी होत असताना पार्किंगसाठी राखीव असलेल्या जागाही बळकावायच्या असे प्रकार काही मोठय़ा बिल्डरांनी सुरू केल्याचे उघड होऊ लागले आहे. वाशी सेक्टर चार येथे एका मोठय़ा समूहाच्या रुग्णालयात इमारतीचे इमले दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र त्या ठिकाणी आवश्यक पार्किंग व्यवस्था मात्र उपलब्ध करून दिली जात नसल्याचे चित्र आहे.
राज्यातील एका बडय़ा राजकीय नेत्याशी संबंधित असलेल्या या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने इमारतीचे वाढीव बांधकाम करताना भविष्यात पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल, असे लेखी आश्वासन नवी मुंबई महापालिकेच्या नगररचना विभागास दिले. या लेखी आश्वासनावर नगररचना विभागाने रुग्णालयाच्या वाढीव बांधकामास भोगवटा पत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार वाशीतील माहिती अधिकाराचे कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी उघड केला आहे. वाशी सेक्टर एक येथे उभ्या राहिलेल्या गणेश टॉवर या पुनर्विकास झालेल्या इमारतीत रस्त्याच्या पुढील बाजूस मोठय़ा प्रमाणावर व्यावसायिक गाळे काढण्यात आले आहेत. या गाळ्यांसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याने सध्या वाशीच्या मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचे अक्षरश: तीनतेरा वाजल्याचे चित्र आहे. शहरातील संपूर्ण पुनर्विकासाची प्रक्रिया या एका टॉवरच्या बांधकामामुळे वादात सापडली आहे. नवी मुंबईत बिल्डरांकडून अशा प्रकारे पार्किंग चोरीचे प्रकार घडत असताना ठाणे जिल्ह्य़ातील इतर शहरांमध्येही परिस्थिती काही वेगळी नाही. ठाणे महापालिकेचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी अशा प्रकारे एफएसआय चोरी करणाऱ्या बिल्डरांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली असून शहरातील काही राजकीय नेते त्यामुळे अडचणीत सापडले आहेत.
‘घरापुढे अंगण आणि परसदारी बाग’ हे एकेकाळी घर बांधण्याचे गृहित तत्व होते. काळाबरोबर ही संकल्पना मागे पडली. घरांवर एकाचे दोन, दोनाचे चार मजले चढले आणि आता तर गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या. सोबत घरटी एकेक वाहनही आले. परंतु पारंपरिक शहाणपण गहाण टाकून आणि नगर नियोजनाचा पूर्ण बोऱ्या वाजवून होणाऱ्या शहरांच्या चौफेर आणि बेसुमार वाढीमध्ये मूलभूत गोष्टींकडेही अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले. आधीच चिंचोळे रस्ते आणि त्यावर उभ्या राहिलेल्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी आज सर्वच शहरांमध्ये एक असह्य डोकेदुखी झाली आहे. शहरांमध्ये उद्याने, क्रीडांगण, मोकळ्या जागा या ‘सुविधां’बरोबरच ‘पार्किंग’चीही सुविधा आज अत्यावश्यक बनली आहे. ठाण्याच्या परिसरातील शहरे सध्या बहुधा जगात सर्वाधिक वेगाने विस्तारत आहेत. पार्किंगविना होणारा हा विस्तार आता एका भयानक वळणावर येऊन ठेपला आहे.
पूर्वी पार्किंगसंबंधी नियम कडक नसल्याने जुन्या इमारतींमध्ये पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याचे चित्र ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई अशा शहरांमध्ये प्रकर्षांने दिसते. नव्याने उभ्या राहणाऱ्या इमारतींमध्ये मात्र पार्किंगचे नियम कडक आहेत. असे असले तरी अगदी अलीकडच्या काळापर्यंत उभ्या राहिलेल्या बडय़ा इमारती तसेच मॉलमध्येही पार्किंग व्यवस्थेचे नियम काटेकोरपणे पाळले गेलेले नाहीत, असा आक्षेप नगरनियोजन विभागाचे अभ्यासक तसेच माहिती अधिकारातील एक कार्यकर्ते अॅड. संदीप ठाकूर यांनी वृत्तान्तशी बोलताना घेतला. या इमारतींचा भार अर्थातच शहराच्या नियोजनावर पडत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा