पश्चिम व पूर्व नागपुरातील सुधार प्रन्यासच्या उद्यानांत स्वच्छतागृहे व पाण्याची व्यवस्थाच नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पश्चिम नागपुरात एकूण १६ उद्याने असून त्यातील १५ उद्यानांत आणि पूर्व नागपुरातील ११ पैकी ९उद्यानांत स्वच्छतागृहे आणि पाण्याची व्यवस्थाच नाही. विशेष म्हणजे या उद्यानांच्या देखरेखीवर दरवर्षी लाखो रुपये खर्च करण्यात येतात.
 २०१३-१४ मध्ये पश्चिम नागपुरातील १६ उद्यानांच्या देखरेखीवर २९ लाख ८८ हजार रुपये खर्च करण्यात आले. त्यामध्ये एकटय़ा राजीव गांधी उद्यानावर ८ लाख ७६ हजार, १० लहान उद्यानांवर ११ लाख ५२ हजार आणि ५ लहान उद्यानांवर ९ लाख ६० हजार रुपये खर्च झाले. चालू आर्थिक वर्षांत राजीव गांधी उद्यानाच्या देखरेखीवर ५ लाख ८४ हजार, १० लहान उद्यानांवर ७ लाख ६८ हजार आणि ५ लहान उद्यानांवर ६ लाख ४० हजार रुपये खर्च करण्यात आले. राजीव गांधी उद्यानातील ८ वृक्षे तोडण्यात आली आहेत. पूर्व नागपुरात सुधार प्रन्यासची एकूण ११ उद्याने आहेत. यातील तीन उद्याने सोडली तर अन्य नऊ उद्यानांतही स्वच्छतागृहे आणि पाण्याची सोय उपलब्ध नाही. लता मंगेशकर उद्यान, पारडी उद्यान आणि स्वर्ण जयंती उद्यानात स्वच्छतागृहे आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये सुधार प्रन्यासला नागपूर शहरात किती उद्यान आहेत व त्यात स्वच्छतागृहे व पाण्याची व्यवस्था आहे काय, अशी माहिती विचारली होती. या माहितीवरून पश्चिम व पूर्व नागपुरातील उद्यानाची आश्चर्यकारक माहिती प्राप्त झाली.  
 अंबाझरी येथील क्रेझी कॅसलला कोणत्या अटीनुसार विवाह करण्यास परवानगी देण्यात आली, असा प्रश्नही विचारण्यात आला होता. या प्रश्नाच्या उत्तरात सांगण्यात आले की, सन २०१०-११ पासून वॉटर कम् अ‍ॅम्यूजमेंटच्या निर्धारित वेळेनंतर स्वागत समारंभ (रिसेप्शन पार्टी) आयोजित करण्यास रितसर परवानगी देण्याबाबत करारनाम्यात सुधारणा करण्यास सुधार प्रन्यासच्या विश्वस्त मंडळाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी अतिरिक्त वार्षिक प्रिमियम आकारण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दाखल एका जनहित याचिकेच्या सुनावणीप्रसंगी नागपूर सुधार प्रन्यासला शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्या निर्देशानुसार सुधार प्रन्यासच्या विश्वस्त मंडळाने सुधारित ठराव मंजूर केला होता, अशी माहितीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
क्रेझी कॅसलने सुधार प्रन्याससोबत केलेल्या कराराचा कितीवेळा भंग केला व त्याबद्दल काय कारवाई करण्यात आली, असा प्रश्नही कोलारकर यांनी विचारला होता. याबाबतची माहिती संकलित स्वरूपात उपलब्ध नसून संबंधित गस्तावेज कार्यालयीन वेळेत अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. विनंती केल्यास दस्तावेजांच्या प्रति नियमाप्रमाणे शुल्क आकारून देण्यात येतील, असे हास्यास्पद उत्तर देऊन आपली सुटका करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

Story img Loader