संसदेत जे घडते ते अतिशय लाजिरवाणे असून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करताना असंसदीय भाषा आणि कृतीचा वापर नेत्यांना अशोभनीय आहे, अशा परखड शब्दात ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी संसदेतील गदारोळावर टीका केली. धनवटे नॅशनल महाविद्यालयात आयोजित वार्तालापात ते बोलत होते.
भारतीय लोकशाही सशक्त असून त्यात देशाच्या हिताचे निर्णय घेणे अपेक्षित असताना संसदेत ज्या प्रमाणे मासळीबाजार भरवला जातो तो लोकशाहीला हितावह नाही. भारतीय राजकीय व्यवस्थेला प्रगल्भ परंपरा असून माझा लोकशाहीवर विश्वास आहे. बाहेरच्या राष्ट्रांच्या तुलनेत आपल्या देशाची लोकशाही अजूनही टिकून आहे, हे सशक्त लोकशाहीचे उत्तम उदाहरण आहे, असे ते म्हणाले. पत्रकारांनी विचारलेल्या काही राजकीय प्रश्नांवर भटकरांनी बोलण्यास नकार दिला मात्र, मोठय़ा राज्यांपेक्षा लहान राज्यांचा विकास करणे सोपे जाते, असे वेगळ्या विदर्भाच्या मुद्दय़ावरील मत त्यांनी व्यक्त केले.
लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेवर विश्वास व्यक्त करून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने म्हणजे व्होटिंग मशिनच्या सहाय्याने होणारी पारदर्शक निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून प्रयोगशाळेत वोटिंग मशीनचा शोध लोकशाहीला हितावह ठरू शकतो, असे त्यावेळी वाटले नव्हते. एका बाजूला भारतीय लोकशाहीची प्रशंसा करीत असतानाच दुसऱ्या बाजूला भारतीय मानवी विकास दर अत्यल्प असल्याबद्दल डॉ. भटकर यांनी चिंता व्यक्त केली.
भारतीय अध्यात्मिक परंपरेचा उल्लेख करताना डॉ. भटकरांनी भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षाही (जीडीपी) अध्यात्म महत्त्वाचे असल्याचे म्हटले. गुलाबराव महाराजांच्या विपुल ग्रंथलेखन आणि ज्ञानेश्वरांच्या प्रतिभांचे दाखले त्यांनी दिले. गुलाबराव महाराजांचे लिखाण प्रखर तर्कवादाच्या चौकटीत आहे. त्यांच्या लेखनात वेद, पुराणे, रामायण, महाभारत, स्मृती वगैरेंची संत वचनांच्या आधाराने समन्वय केलेली शास्त्रीय मांडणी आहे. त्यांचे समग्र वाङ्मय महाराष्ट्रातील घराघरात पोहोचावे म्हणून विषयवार मांडणी करून एकूण ५०० पृष्ठे असलेल्या ग्रंथाची १६ खंडात विभागणी करून ते प्रकाशित करण्याचा पुण्याच्या जवळ असलेल्या आळंदी देवाची येथील संत गुलाबराव महाराज सवरेदय ट्रस्टचा मानस असून प्रत्येक खंडाच्या एक हजार प्रती छापून प्रकाशित करण्यासाठी सुमारे एक लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या १६ खंडांपैकी १० खंडांना प्रायोजक मिळाले आहेत. शिल्लक राहिलेल्या खंडांसाठी प्रायोजकांनी पुढे यावे, असे आवाहन भटकरांनी केले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष नारायण मोहोड, प्राचार्य डॉ. बबन तायवाडे, सेवानिवृत्त प्राध्यापक शरद पाटील, रमेश ठाकरे आणि प्राचार्य बुरघाटे आदी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा