सलग तीन वेळेस जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडून आलेले रावसाहेब दानवे यांच्या विरोधात त्या पक्षात या वेळेस कुणी उमेदवारी मागेल, असे वाटत नव्हते. परंतु त्या पक्षातील ज्ञानदेन बांगर यांनी अलीकडेच उमेदवारीसाठी आपली इच्छा जाहीर केली आहे. तर ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांचीही उमेदवारीसाठी असलेली इच्छा लपून राहिलेली नाही. त्यामुळे भाजपामध्ये ‘पायात पाय’ घालण्याची संधी अचूकपणे साधली जात आहे.
खासदार रावसाहेब दानवे सलग दोन वेळेस विधानसभेवर तर लागोपाठ तीन वेळेस लोकसभेवर निवडून गेलेले आहेत. सहकारी साखर कारखाना अधिपत्याखाली असणारे दानवे यांनी जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँकेसारख्या संस्थांतही आपले अस्तित्व ठेवलेले असून शिक्षण क्षेत्रातही त्यांची ओळख आहे. एवढा दबदबा असणाऱ्या दानवेंच्या विरोधात भाजपकडे उमेदवारीची अपेक्षा काही पुढारी का ठेवीत आहेत, असा प्रश्न जिल्ह्य़ातील राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. परंतु त्या सोबतच भाजपमध्ये काहीही घडू शकते, असे मत व्यक्त करून या संदर्भातील काही उदाहरणेही देण्यात येत आहेत.
१९७७ मध्ये जनता पार्टीकडून आणि १९८९ मध्ये जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडून आलेले पुंडलिकराव दानवे यांना १९९६ मध्ये उमेदवारी नाकारून बाहेरच्या पक्षातून आलेले उत्तमसिंग पवार यांना उमेदवारी दिली होती. १९९६ आणि १९९८ या दोन्हीही निवडणुकीत उत्तमसिंग पवार यांनी जालना लोकसभेची जागा भाजपच्या तिकिटावर जिंकली होती. पुंडलिकरावांना भाजपने डावलल्याचा धक्का १९९६ मध्ये त्या पक्षातील अनेक जुन्या कार्यकर्त्यांना बसला होता. त्यानंतर पुंडलिकराव भाजपपासून दुरावत गेले आणि त्यांचे चिरंजीव चंद्रकांत दानवे भोकरदन विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळेस भाजपचा पराभव करून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले.
मागील लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे निवडून जरी आले तरी प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या तुलनेत त्यांचा जालना जिल्ह्य़ातील जनाधार कमी झाला होता. जालना लोकसभा मतदारसंघात एकूण ६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून त्यापैकी तीन जालना जिल्ह्य़ातील तर तीन औरंगाबाद जिल्ह्य़ातील आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत दानवे यांना जालना जिल्ह्य़ात प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवारापेक्षा ४ हजार ७७५ मते कमी होती. औरंगाबाद जिल्ह्य़ातील तीन विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात १३ हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळाल्यानेच दानवे यांचा विजय त्या वेळी झाला होता. भाजपचे औरंगाबाद जिल्ह्य़ातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांच्या प्रभावाखालील हा भाग असल्याने ते या वेळेस उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.
ज्ञानदेव बांगर हे आणखी एक उमेदवारीसाठी इच्छुक असलेले नेते आहेत. १९९७ आणि १९९८ मध्ये ते जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार होते आणि भाजपकडून पराभूत झाले होते. १९९६ मध्ये त्यांचा पराभव १ हजार ८०८ मतांनी झाला होता, तर १९९८ मध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तिरंगी लढतीत दुसऱ्या क्रमांकावर होते. गेल्या १२ वर्षांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
जालन्यातून लोकसभेसाठी भाजपच्या तिघांचे पायात पाय
सलग तीन वेळेस जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडून आलेले रावसाहेब दानवे यांच्या विरोधात त्या पक्षात या वेळेस कुणी उमेदवारी मागेल, असे वाटत नव्हते.
First published on: 06-01-2014 at 01:35 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parliamentary election bjp jalna