कमी वयात राजीव सातव यांनी जे कर्तव्य दाखविले आहे, त्यामुळे महाराष्ट्र त्यांच्याकडे आशेने बघत आहे. त्यांनी आता लोकसभेत यायलाच हवे, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे सातव यांचे तोंडभरून कौतुक केले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही या वक्तव्याला साथ दिली. त्यामुळे बुधवारी पुन्हा हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या अदलाबदलीची चर्चा रंगली.
सातव यांच्या कौतुक सोहळ्यात शिंदे असेही म्हणाले की, त्यांना कोणत्याही शिफारशींची गरज नाही. आता आमचीच शिफारस त्यांनी करावी, अशी वेळ आहे. कळमनुरी तालुक्यातील येलकी शिवारात ७७ एकर जमिनीवर स्थापन करण्यात येणाऱ्या सशस्त्र सीमा बल प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन िशदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. गेल्या दीड वर्षांपासून हिंगोलीच्या जागेसाठी काँग्रेसकडून राजीव सातव यांचे नाव चर्चेत आहे. थेट पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडूनच त्यांचे नाव येईल. त्यामुळे हिंगोली लोकसभेची जागा राष्ट्रवादीच्या वाटय़ाला असली तरी त्याची अदलाबदल होईल, अशी चर्चा आहे. माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी मात्र जागा राष्ट्रवादीचीच आहे आणि ती आम्हीच लढवू, असे सांगत प्रचारालाही सुरुवात केली होती. तथापि, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जागावाटपाबाबत पुन्हा चर्चेला तोंड फोडले आहे.
केंद्रीय मंत्री शिंदे यांनी सातव यांनी लोकसभेत यावे, असे बुधवारी जाहीर सभेत सांगितले. त्याला महसूलमंत्री थोरात यांनी जोरदार पाठिंबा दिला. सातव यांना लोकसभेत निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असेही ते म्हणाले.
येलकी येथील सशस्त्रसेना बल विभागाच्या कामासाठी पहिल्या टप्यात ५४ कोटींचा निधी दिला आहे. हे काम २ वर्षांत पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या दलातील पोलिसांना सेवेत असताना व निवृत्तीनंतरही सन्याप्रमाणेच सोयीसुविधा देण्याचा निर्णय या वर्षी घेण्यात आला आहे. ज्या-ज्या ठिकाणी या दलाचे प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येत आहे, त्या-त्या भागातील स्थानिक तरुणांना प्राधान्याने भरतीत संधी देण्याच्या सूचना यावेळी त्यांनी या विभागाचे महानिर्देशक अरुण चौधरी यांना दिल्या.
एस.एस.बी.चे निदेशक अरुण चौधरी यांनी सुरुवातीला एस.एस.बी.च्या एकूण कामाची, विभागाच्या स्थापनेची सविस्तर माहिती दिली. कळमनुरीत केंद्रीय राखीव पोलीस बलाचे प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याची मागणी सातव यांनी लावून धरली होती.

Story img Loader