विक्षीप्त वागणुकीमुळे तालुक्यातील प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरलेल्या एसटीच्या आगारप्रमुख व्यवहारे यांनी आज एका प्रवाशाला बेदम मारहाण केली. यासंदर्भात त्यांच्या विरोधात पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, व्यवहारे यांनी सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती असून लवकरच त्यांची पारनेर येथून इतरत्र बदली करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.
पिंपरीजलसेन येथील भानुदास पांडुरंग साळवे (वय ३३) हे सोमवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास आगारप्रमुख आर. टी. व्यवहारे यांच्या कार्यालयात बसच्या चौकशीसाठी गेले होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास सुटणारी पारनेर-मुंबई ही बस पिंपरीजलसेन मार्गे नेण्यासाठी साळवे प्रयत्नशील आहेत. याचसंदर्भात साळवे हे सोमवारीही आगारप्रमुखांकडे गेले होते. वारंवार मागणी करीत असल्यामुळे संतप्त झालेल्या आगारप्रमुख व्यवहारे यांनी कार्यालयात प्रवेश करताच साळवे यांना शिवीगाळ सुरू करीत मारहाणही केली.
आगारप्रमुख व्यवहारे यांनी मारहाण केल्यानंतर साळवे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात व्यवहारे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. दरम्यान व्यवहारे यांच्या मनमानी कारभाराविरोधात आमदार विजय औटी यांनी गेल्या दि. ११ ला पारनेर आगारात उपोषण करून व्यवहारे यांच्या बदलीची मागणी केली होती. विभागनियंत्रक मिलींद बंड यांच्यासह विभागीय अभियंता शिवाजीराव जाधव, वाहतूक अधिकारी राजेंद्र साळवे यांनी तातडीने उपोषणस्थळी धाव घेउन लोकप्रतिनिधींना उपोषण करावे लागत असल्याबददल दिलगिरी व्यक्त केली होती. आगारप्रमुखांच्या बदलीचा प्रस्ताव वरीष्ठांकडे पाठविण्याचे आश्वासनही विभाग नियंत्रकांनी यावेळी दिले होते.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमदार औटी यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही आगारप्रमुखांनी त्यावेळी बस बंद करून आगाराचे कामगाच ठप्प केले होते. अखेर विभाग नियंत्रकांनी खडसावल्यानंतर वाहतूक पुर्ववत सुरू करण्यात आली. तरीही व्यवहारे यांनी राळेगणसिद्घी येथे जाऊन आमदार औटी यांच्या विरोधात तक्रार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दिलेल्या निवेदनातही आज मारहाण करण्यात आलेल्या प्रवाशाचा उल्लेख असून या प्रवाशाने अपणास नग्न करा, मारा असे म्हणत अंगावर धाऊन आल्याचे म्हटले होते.

Story img Loader