शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आजारी होते. त्यानंतर शिवसेनाप्रमुखांचे निधन झाले. त्यामुळे महायुतीत भीमशक्तीला जागा किती हा तिढा सुटला नाही. महिनाभरात यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी येथे सांगितले. विधानसभेच्या ३० ते ३५ जागा व लोकसभेच्या ४ जागांवर भीमशक्तीने दावा सांगितला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त रिपब्लिकन पक्षातर्फे विशेष मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यानिमित्त शहरात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राजकीय गणितांची मांडणी सांगितली. काही राखीव जागा व काही खुल्या जागांवर चर्चा होईल.   एक   वर्ष आधी कोणत्या जागा कोणाला हे ठरले तर सक्षम उमेदवार शोधणे शक्य होईल, असेही आठवले म्हणाले.
साहित्य संमेलनाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिल्याच्या वादावर बोलताना ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकले होते. निळे व भगवे झेंडे एकत्र आणण्याचे काम त्यांनी केले.
हे परिवर्तन असल्याने परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी वाद निर्माण करणे चुकीचे होते. मराठवाडय़ात भीषण दुष्काळ असून अनेक लोक मुंबई, सुरत येथे स्थलांतरित होत आहेत. मराठवाडय़ात १ हजार २४२ टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, किमान एक हजार कोटी रुपये केंद्र सरकारने द्यावेत, अशी मागणी आठवले यांनी केली. कोकण किनारपट्टीवर पडणारा   पाऊस    वळविण्यासाठी    नद्या जोड प्रकल्प राबवावा व त्यासाठी १० हजार कोटी केंद्राने द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव आले की नेहमीच संघर्ष करावा लागतो. विद्यापीठाचा नामविस्तार संघर्षांनंतर झाला. इंदू मिलची जागा संघर्षांनेच मिळाली. त्यांचे नाव आले की, संघर्षांची मानसिकता वाढीला लागते. हे बदलण्याची गरज आहे. देश संविधानामुळेच टिकून असल्याचेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा