गेल्या दोन दशकांहून अधिक काळ रेंगाळलेल्या ठाणे जिल्हा विभाजनाच्या प्रश्नाबाबत राज्य विधिमंडळाच्या येत्या हिवाळी अधिवेशनात निर्णय होण्याची शक्यता असली तरी हा निर्णय घेताना समितीने आपल्याला अजिबात विश्वासात घेतले नाही, अशी कल्याण पट्टय़ातील लोकप्रतिनिधींची भावना आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या मुद्दय़ावर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न या भागातील सर्वपक्षीय आमदार करणार आहेत. राष्ट्रवादीचे आमदार किसन कथोरे अगदी सुरुवातीपासूनच कल्याण जिल्ह्य़ासाठी आग्रही आहेत. समितीने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आधी संपूर्ण जिल्हा पाहायला हवा होता. तेथील लोकप्रतिनिधींची मते जाणून घ्यायला हवी होती. दुर्दैवाने जिल्हा विभाजनाबाबत शिफारस करण्यासाठी नेमलेल्या समितीने ‘कल्याण’ परिसरातील जनतेच्या भावना आणि गरजा लक्षात न घेताच आपला अहवाल सादर केला आहे, असा स्पष्ट आरोप करीत किसन कथोरे यांनी आता जाहीरपणे कल्याणचा कैवार घेतला आहे.
देशातील सर्वाधिक लोकसंख्या ठरलेल्या ठाण्याचे आता विभाजनाऐवजी त्रिभाजन करावे, असा एक मतप्रवाह आहे. नवी मुंबई, ठाणे आणि मिरा-भाईंदर या संपूर्ण नागरीकरण झालेल्या शहरांचा उपनगर जिल्हा, वसई, पालघर, तलासरी, जव्हार, मोखाडा, तलासरी, वाडा, विक्रमगड तालुक्यांचा आदिवासी जिल्हा आणि शहापूर, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण या तालुक्यांचा कल्याण जिल्हा असे त्रिभाजनाचा पर्यायही समितीपुढे ठेवण्यात आला होता. कल्याण पट्टय़ातील सर्व पालिका तसेच पंचायत समित्यांनी कल्याण जिल्ह्य़ास अनुमती देणारे ठराव एकमताने संमत केले आहेत. या पट्टय़ातील सर्वपक्षीय ११ आमदारांची कल्याण जिल्हा व्हावा, अशी आग्रही मागणी आहे.
चौथी मुंबई-तिसरा जिल्हा
सध्या मुंबई महानगर प्रदेश परिसरात कल्याण ते बदलापूर या पट्टय़ात नागरीकरणाचा सर्वाधिक वेग आहे. कारण तुलनेने याच परिसरात सध्या स्वस्त घरे उपलब्ध आहेत. कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेतून वगळण्यात आलेली २७ गावे, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, शहाड, आंबिवली, टिटवाळा, कल्याण-मुरबाड, शहापूर या परिसरातील लोकसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. चौथी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात कल्याण हे मध्यवर्ती ठिकाण आहे. खरेतर ठाणे जिल्ह्य़ाच्या त्रिभाजनाबरोबच रायगड जिल्ह्य़ाची पुनर्रचना करून नेरळ-कर्जत हा मध्य रेल्वेवरील स्थानकांचा परिसर कल्याण जिल्ह्य़ास जोडावा, अशीही या परिसरातील नागरिकांची मागणी आहे. कारण तेथील नागरिकांसाठीही अलिबाग हे जिल्ह्य़ाचे ठिकाण म्हणून अत्यंत गैरसोयीचे आहे. चौथी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागासाठी कल्याण जिल्ह्य़ाची निर्मिती सोयीची ठरेल, अशी या भागातील लोकप्रतिनिधींची मागणी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा