युती आणि आघाडी तुटल्यानंतर सर्वच पक्षांसमोर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी प्रबळ उमेदवार नसल्याने ऐनवेळी त्यांना दुसऱ्या पक्षांमधील नाराजांना पक्षात स्थान देत थेट उमेदवारी द्यावी लागली. या घोळामुळे त्या त्या पक्षांसमोरील उमेदवारीचे संकट दूर झाले असले तरी कार्यकर्ते मात्र संभ्रमित आहेत. त्यामुळेच की काय अजून प्रचाराला फारशी सुरूवातही झालेली नाही. आपल्या नेत्याने रात्रीतून पक्ष बदलणे बहुतांश कार्यकर्त्यांच्या पचनी पडलेले नसल्याने अशा नाराज कार्यकर्त्यांना प्रचारासाठी जुंपणे हे उमेदवारांपुढे एक आव्हान आहे.
अनपेक्षित घडामोडींमुळे ही विधानसभा निवडणूक कमालीची रंगतदार झाली आहे. प्रमुख सर्वच पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने आणि शेवटच्याक्षणी सर्वच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केल्याने सर्वाचीच तारांबळ उडाली. आतापर्यंत युती तसेच आघाडी करून निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या प्रमुख पक्षांना स्वतंत्रपणे लढत असल्याने सर्वच मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करण्याचे आव्हान निर्माण झाले. मोजक्या मतदारसंघांचा अपवाद वगळता सर्वच पक्षांना उमेदवारांची शोधाशोध करताना दमछाक झाली. इतर पक्षांमधील इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांना आपल्या पक्षाकडे ओढून थेट उमेदवारीच गळ्यात टाकण्याचे प्रकार झाले. एका रात्रीतून झालेल्या या घडामोडींमुळे त्या त्या पक्षाची आणि उमेदवाराची राजकीय सोय झाली असली तरी गेल्या पाच वर्षांपासून संबंधित उमेदवाराचे कार्यकर्ते म्हणून काम करणाऱ्यांची मात्र गोची झाली आहे. आपल्या नेत्यांने उमेदवारीसाठी पक्ष बदलाच्या घेतलेल्या निर्णयामुळे कालपर्यंत ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी आपण भांडत आलो, त्यांच्याशी एका दिवसात कसे जमवून घ्यावे, असा प्रश्न कार्यकर्त्यांना सतावत आहे. त्यामुळेच र्अज छानणीची मुदत संपली तरीही पक्ष बदल केलेल्या उमेदवारांचे कार्यकर्ते अद्याप प्रचारापासून दूरच आहेत.
यावेळी निवडणूक प्रचारासाठी अवघे १२-१३ दिवस मिळणार असल्याने कार्यकर्त्यांचे महत्व अधिकच वाढले आहे. कमी अवधीत सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान कार्यकर्त्यांची सोबत नसेल तर पेलणे अशक्य आहे, याची जाणीव अशा उमेदवारांना झाल्याने कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. परंतु कार्यकर्त्यांकडून उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रश्नांमुळे उमेदवारांचीही पंचाईत होत आहे. पाच वर्षांपासून ज्या पक्षात काम केले. ज्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून मतदारसंघात ओळख निर्माण झाली. त्या पक्षाऐवजी आता ज्या पक्षाविरोधात भूमिका घेत आलो त्या पक्षाला मतदान करण्याचे आवाहन लोकांना करावे तरी कसे, हा प्रश्न कार्यकर्त्यांना भेडसावत आहे.
केवळ आमच्या नेत्याने भूमिका बदलल्याने आपणासही भूमिका बदलावी लागत असल्याचे कार्यकर्त्यांना अधिक दु:ख आहे. या दु:खामुळे दुरावलेल्या कार्यकर्त्यांअभावी निवडणुकीला सामोरे जाणे अशा उमेदवारांसाठी एक दिव्य झाले आहे.      

Story img Loader