मुंबईहून पनवेल एसटी डेपोमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट घेऊन सक्तीने खोळंब्याचा प्रवास करावा लागत आहे. पनवेल आगारामध्ये सुरू झालेल्या डिझेल पंपामुळे हा खोळंबा होत आहे. या पंपामुळे येथे वाहतूक कोंडी होत आहे. डिझेल भरण्यासाठी पनवेल आगारात आलेल्या बसगाडय़ांमधील प्रवाशांचे यामुळे हाल होत आहेत. पनवेल एसटी डेपोमध्ये गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर डिझेल पंप सुरू करण्यात आला. या पंपामध्ये पनवेल एसटी डेपोसह पनवेलमार्गे मुंबई व इतर ठिकाणी जाणाऱ्या बसमध्ये डिझेल भरण्याची सोय करण्यात आली. एकाच वेळी येणाऱ्या बसगाडय़ांमुळे आगारात कोंडी पाहायला मिळते. पनवेल डेपोमधून दर दोन मिनिटाला प्रवाशांसाठी बससेवा आहे. मात्र एसटी बस प्रवाशांसाठी डेपोमध्ये नेण्यापूर्वी तिचे डिझेल तपासून नंतरच ती सेवेसाठी उपलब्ध झाल्यास हा प्रश्न निकाली निघू शकतो. तसेच लांब पल्ल्याच्या बसगाडय़ांवरील चालकाने प्रवास सुरू होण्यापूर्वी डिझेल टाकी फुल केल्यास ही समस्या सुटू शकते. मात्र चालकांच्या माथी कोण लागणार, या उक्तीप्रमाणे एसटीचे आगार व्यवस्थापकही नियमांवर बोट ठेवून आपले कर्तव्य पार पाडत आहे. पनवेलचे वरिष्ठ आगार व्यवस्थापकांच्या चुकीच्या नियोजनामुळे हा खोळंबा होत असल्याचे येथील वाहनचालक दबक्या आवाजात सांगतात. चालक व वाहकांकडून सूचना ऐकून न घेता वरिष्ठ आगार व्यवस्थापक हेकेखोरपणाने वागत असल्याचे चालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. याबाबत आगार व्यवस्थापक परदेशी यांना विचारणा केली असता पनवेल आगारामध्ये डिझेल भरण्यासाठी येणाऱ्या वाहनांची कोंडी होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अधिक माहिती देण्यास नकार दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा