ऐन उन्हाळ्यात वातानुकूलन यंत्रणा वारंवार बंद पडत असल्याने आणि सेवेचा दर्जा खालावल्याने एसटीच्या प्रतिष्ठेच्या ‘शिवनेरी’ बसचा प्रवास टाळणेच श्रेयस्कर, असा निर्णय घेण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. आरक्षण करूनही बसच थांब्यावर न आल्याचे अनेक प्रकार घडूत आहेत. एसटीला पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालकच गेले अनेक महिने नाही. ज्या अधिकाऱ्याकडे एसटीचा अतिरिक्त भार आहे त्याला वेळ नाही. अशा परिस्थितीत दोषींवर काही कारवाईसुद्धा होण्याची शक्यता नाही.
शिवनेरी ही वातानुकूलित सेवा चांगलीच फायद्यात असूनही प्रवाशांना सेवा देण्याकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले आहे. मुंबई-पुणे दरम्यान उच्च मध्यमवर्गातील हजारो प्रवासी शिवनेरी बसने प्रवास करतात. एसटीच्या ११० वातानुकूलित गाडय़ा असून त्यापैकी ९० टक्के खासगी आहेत.
कंत्राटदाराकडून गाडी व वाहनचालक पुरविण्यात आले असून एसटी त्यांना प्रत्येक फेरीमागे ठरावीक रक्कम देते. जुन्या व निकामी झाल्याने २५ गाडय़ा बाद करण्यात येणार होत्या. पण नव्या गाडय़ाच उपलब्ध न झाल्याने त्याच रस्त्यावर धावत आहेत. वातानुकूलन यंत्रे आणि गाडय़ांमध्येही बिघाड होण्याचे प्रकार वाढले आहेत. पुणे-दादर (एमएच ११ टी ९२५१) या शिवनेरी बसमधील वातानुकूलन यंत्र सोमवारी बंद पडल्याने प्रवाशांना मनस्ताप झाला. पण एसटी प्रशासन व कंत्राटदार कोणीही या प्रकारांकडे लक्ष देत नसून प्रवाशांचे हाल सुरू आहेत.
या बसमध्ये पिण्याच्या पाण्याची बाटली पुरविली जाते. तीही प्रत्येक प्रवाशाला दिली न जाता त्यातून काहीजण वरकमाई करतात. बोरिवली-पुणे मार्गावरील गाडय़ाही चांगल्याच फायद्यात असून त्यामध्ये एसटीकडून कंडक्टर पुरविला जातो. मुंबईत वाकोला ब्रिज व अन्य ठिकाणी चार-पाच थांबे असून तेथे साधी प्रवासी शेडही बांधलेली नाही. त्यामुळे प्रवासी रस्त्यावर उन्हात उभे असतात आणि संगणकीय आरक्षण करूनही बस थांब्यावर येतच नसल्याचे प्रकार घडत आहेत.
हे थांबे पुलाच्या खाली असून अनेकदा बस पुलावरून निघून जाते. गाडीची डिकी उघडण्यासाठी वाहनचालक खाली उतरत नसल्याने वयस्कर व महिला प्रवाशांनाही स्वत:च सामान बसच्या डिकीत ठेवावे लागते. प्रवाशांनी लेखी तक्रारी करूनही हे प्रकार थांबलेले नाहीत. एसटीला पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालकच नसल्याने आणि कार्यभार असलेल्या व्ही. एन. मोरे यांच्याकडे एसटीसाठी वेळच नसल्याने एसटीच्या कारभारात सुधारणा कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महागडय़ा शिवनेरीने प्रवास करण्यापेक्षा खासगी ट्रॅव्हल्सच्या बसने मुंबई-पुणे प्रवास करण्याचा प्रवाशांचा कल वाढला आहे.