जुन्या फेऱ्यांना मुहूर्त सापडेना
१५ फेब्रुवारीचा मुहूर्तही टळला
ठाणे-कर्जतवरील भार वाढला

 मुंबईतील रेल्वे मार्गावर यंदा ७२ नव्या फेऱ्या सुरू करण्याची घोषणा रेल्वेमंत्री पवन बन्सल यांनी केली असली तरी ठाण्यापासून पुढे कल्याण, अंबरनाथ, कर्जत-कसाऱ्यापर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी यापूर्वीच जाहीर झालेल्या ३२ फेऱ्यांचे आश्वासन अद्याप कागदावरच असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त करण्यात येत आहे.
मध्य रेल्वेच्या एका अहवालानुसार ठाणे, कल्याण, अंबरनाथ, डोंबिवली या रेल्वे मार्गावर दररोज सुमारे ११ लाख प्रवासी प्रवास करीत असतात. नवी मुंबईतील प्रवाशांसाठी ठाण्यापासून-पनवेलपर्यत ट्रान्सहार्बर मार्ग सुरू करण्यात आल्याने या भागातील प्रवाशांचा भारही ठाणे स्थानकावर आला आहे. नवी मुंबईतून मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या मार्गावर प्रवास करण्यासाठी ट्रान्सहार्बर मार्गाचा वापर करणाऱ्या प्रवाशांचा आकडा बराच मोठा आहे. ठाण्यापासून कल्याणपल्याडच्या उपनगरांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहून मध्य रेल्वेने या मार्गावर ३२ नव्या फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय मध्यंतरी घेतला. ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना त्यांनी या नव्या फेऱ्यांची घोषणा केली. ठाणे-कसारा मार्गावर मागील दोन वर्षांत यापैकी अवघ्या तीन फेऱ्या सुरू झाल्याची धक्कादायक माहिती कल्याणचे खासदार आनंद परांजपे यांनी वृत्तान्तला दिली. ठाणे-कल्याण-कसारा-खोपोली अशा मार्गावर या ३२ फे ऱ्या सुरू करण्यासाठी यंदा १५ फेब्रुवारीचा मुहूर्तही पक्का करण्यात आला होता. प्रत्यक्षात मध्य रेल्वेला ही वेळ पाळता आलेली नाही, असेही परांजपे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, संपूर्ण मुंबई विभागासाठी जाहीर झालेल्या ७२ फेऱ्यापैकी ठाणेपल्याडच्या प्रवाशांच्या पदरात नेमके किती फेऱ्या पडतात, याविषयी उत्सुकतेचे वातावरण आहे. सीएसटीपासून कल्याणपर्यत १५ डब्यांची लोकल सुरू झाली असली तरी अजूनही प्रवाशांचा भार कमी झालेला नाही. त्यामुळे ठाण्यापासून कर्जत-कसाऱ्यापर्यत शटल सेवेचा विस्तार करण्याची आवश्यकता वेळोवेळी व्यक्त होत आहे. मात्र, घोषणा होऊनही पदरात काही पडत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

Story img Loader