मध्य रेल्वेवरील विविध स्थानकांवरील फलाट आणि उपनगरी गाडय़ांचा फूटबोर्ड यातील जीवघेणी पोकळी प्रवाशांच्या अपघाताला जबाबदार ठरत आहे. काही अपवाद वगळता फलाटांची उंची न वाढविण्याबाबत ढिम्म असलेले रेल्वे प्रशासन या अपघातांसाठी मुख्यत: जबाबदार असले तरी गाडी पकडण्यासाठी प्रवाशांची घाई आणि त्यांचा निष्काळजीपणा या दोन्ही गोष्टीही तितक्याच जबाबदार असल्याचे वास्तव नाकारून चालणार नाही. घाटकोपर रेल्वे स्थानकात गाडी पकडताना मोनिका मोरे या विद्यार्थिनीला हात गमवावे लागण्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी रात्री कुर्ला रेल्वे स्थानकात तन्वीर शेख या तरुणाचे पाय कापले गेल्याची दूर्घटना घडली. अगोदर बारा आणि नंतर पंधरा डब्यांच्या गाडय़ांसाठी फलाटांची लांबी वाढविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर फलाटावरील सिग्नलचा खांब पुढे न हलविणे, खांब हलविला असेल तर तेथे झालेला खड्डा न भरणे, फलाटावरील फरशा उखडलेल्या असणे त्यामुळेही प्रवासी जखमी होत आहेत. याला रेल्वे प्रशासनाचा ढिम्मपणा आणि बेपर्वाई नक्कीच कारणीभूत आहे. पण त्याच बरोबर अशा प्रकारच्या घटना घडण्यासाठी प्रवासीही जबाबदार आहेत ते विसरून चालणार नाही.
‘तो’ अपघात गाडीत चढताना नव्हे तर रूळ ओलांडताना
कुर्ला रेल्वे स्थानकातील अपघात तो प्रवासी गाडीत चढताना नव्हे तर फलाट क्रमांक सहा वरून फलाट क्रमांक सात वर रेल्वेरूळ ओलांडून जाताना घडला असल्याचा प्राथमिक अंदाज कुर्ला रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला आहे. अपघातात पाय गमावलेल्या त्या तरुणाने ‘आपण फलाट क्रमांक ६ वरून रेल्वेरूळ ओलांडून फलाट क्रमांक ७ वर जात असताना गाडीखाली आल्याने हा अपघात घडल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे. अर्थात नेमके कारण अपघाताचे ‘सीसी’टीव्ही चित्रिकरण पाहिल्यानंतरच कळू शकेल, असे कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रमोद बाबर यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले. हा तरुण शीव येथून कुर्ला रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक १ वर उतरला. त्याला गोवंडी येथे जायचे होते. तो फलाट क्रमांक १ वरून दोन, तीन चार फलाटावरील रेल्वेरुळ ओलांडून फलाट क्रमांक पाच वर आला. तेथून फलाट क्रमांक ६ ओलांडून तो फलाट क्रमांक ७ वर जात असताना छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या जलद गाडीखाली आल्याने रात्री साडेदहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमी तन्वीर यांच्यावर शीव रुग्णालयात पुढील उपचार सुरू असल्याची माहितीही बाबर यांनी दिली.
प्रवाशांची घाई; निष्काळजीपणाही अपघातांना कारणीभूत!
मध्य रेल्वेवरील विविध स्थानकांवरील फलाट आणि उपनगरी गाडय़ांचा फूटबोर्ड यातील जीवघेणी पोकळी प्रवाशांच्या अपघाताला जबाबदार ठरत आहे.

First published on: 18-01-2014 at 01:39 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passengers in hurry responsible for accidents