वसरेवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावरील मेट्रो रेल्वेचे दर १० ते २० रुपयांवरून थेट १० ते ४० रुपये होताच, या मार्गावर जवळपास रिकाम्या धावणाऱ्या ‘बेस्ट’च्या बसला पुन्हा एकदा संजीवनी मिळाली आहे. अवघ्या २० रुपयांत अंधेरी-घाटकोपरच्या वातानुकूलित प्रवासासाठी मेट्रोच्या दरवाढीमुळे आता ३० रुपये लागत असल्याने प्रवाशांसाठी पुन्हा एकदा बसच ‘बेस्ट’ ठरली आहे.
वसरेवा-अंधेरी-घाटकोपर या चाकरमान्यांच्या वर्दळीच्या मार्गावर जून २०१४ मध्ये अत्याधुनिक वातानुकूलित मेट्रो रेल्वे सुरू झाली आणि बसच्या रांगा-गर्दी व खडतर प्रवासाला कंटाळलेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला. मेट्रोच्या प्रवासासाठी सवलतीचा दर म्हणून किमान १० रुपये व कमाल २० रुपये प्रवासी भाडे ठेवण्यात आले. त्यामुळे स्वस्तात मस्त आणि वेगवान प्रवासाचे साधन म्हणून मुंबईकरांनी वसरेवा-अंधेरी-घाटकोपर प्रवासासाठी मेट्रो रेल्वेला पहिली पसंती दिली. परिणामी जून ते डिसेंबर २०१४ या सहा महिन्यांत तब्बल पाच कोटी प्रवाशांचा पल्ला मेट्रो रेल्वेने गाठला. प्रवाशांच्या मेट्रो प्रेमाचा फटका अंधेरी-घाटकोपरदरम्यान धावणाऱ्या रिक्षाचालकांना आणि ‘बेस्ट’च्या बसला बसला.
घाटकोपर पश्चिम ते अंधेरी पूर्वदरम्यान धावणारी ‘बेस्ट’ची ३४० क्रमांकाची बस ही एरव्ही सतत प्रवाशांनी भरलेली असायची. मेट्रोमुळे ती रिकामी पडली. हा मार्ग ‘बेस्ट’साठी तोटय़ाचा ठरू लागला. तशात जानेवारी २०१५च्या आरंभी मेट्रोच्या भाडेवाढीबाबत उच्च न्यायालयात प्रलंबित असलेली याचिका मार्गी लागली. त्यामुळे मेट्रोचे दर १० ते २० रुपयांवरून १० रुपये, २० रुपये, ३० रुपये आणि ४० रुपये असे करण्यास मंजुरी मिळाली.
मेट्रो रेल्वेची दरवाढ होताच घाटकोपर ते अंधेरी या टप्प्यासाठी प्रवाशांना २० रुपयांऐवजी ३० रुपये मोजण्याची वेळ आली. प्रत्येक फेरीत थेट १० रुपयांचा भरुदड पडत असल्याने याच प्रवासासाठी सुमारे १५ ते २० रुपये आकारणारी बसच सर्वसामान्य प्रवाशांना ‘बेस्ट’ वाटू लागली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत घाटकोपर ते अंधेरी दरम्यान प्रवास करणारे मेट्रो रेल्वेचे प्रवासी घटले आणि ते पुन्हा बसकडे वळले. पुन्हा एकदा ३४० क्रमांकाची बस आता प्रवाशांनी भरून धावत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा