आदिवासी खात्यांतर्गत नागपूर विभागातील शासकीय आश्रमशाळांचा बारावीचा निकाल यंदा ९०.७३ टक्के तर अनुदानित आश्रमशाळांचा निकाल ८५.३७ टक्के लागला असून गेल्यावर्षीच्या तुलनेत निकालात चांगली वाढ झाली असल्याची माहिती अतिरिक्त आदिवासी विकास आयुक्त डॉ. पल्लवी प्रवीण दराडे यांनी दिली.
आदिवासी विकास खात्याच्या नागपूर विभागात एकूण १०२ शासकीय तर १४४ अनुदानित आश्रमशाळा आहेत. त्यापकी शासकीय ३१ व ३५ अनुदानित आश्रमशाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालये आहेत. २०१३-१४ या शैक्षणिक वर्षांत शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील एकूण ३ हजार ९६५ विद्यार्थ्यांपकी ३ हजार ४६५ विद्यार्थी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. नुकत्याच लागलेल्या उच्च माध्यमिक शालांत निकालामध्ये शासकीय आश्रमशाळांचा निकाल ९०.७३ टक्के तर अनुदानित आश्रमशाळांचा ८५.३७ टक्के लागला. मागील दोन वर्षांत अनुक्रमे ११ व १७ टक्क्यांनी निकाल उंचावला आहे.
आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात दिवसेंदिवस होत असलेल्या शैक्षणिक बदलातील तसेच नवनवीन शैक्षणिक तंत्राबाबत अवगत व्हावे यादृष्टीने शहरातील नामवंत महाविद्यालयीन शिक्षकांच्या माध्यमातून आश्रमशाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात होते. तसेच सुक्ष्म नियोजन आराखडय़ाद्वारे प्रत्येक तास विवक्षित कामासाठी आखून दिल्याने आश्रमशाळेतील शैक्षणिक व व्यवस्थापन कामात सुसूत्रता आली. याशिवाय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना नियमित शालेय कालावधीनंतर काही तास अभ्यासक्रमाचे लिखाण करण्यासाठी ‘लिखाण कार्यक्रम’ यशस्वीपणे राबविण्यात आला. वरील सर्व बाबींच्या काटेकोर अंमलबजावणीचा परिणाम आश्रमशाळेतील शालेय प्रगती व शैक्षणिक उन्नतीवर झाला. पर्यायाने आश्रमशाळेच्या निकालाची टक्केवारी लक्षणीय उंचावली, असे डॉ. पल्लवी दराडे सांगितले. गुणवंत विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले.
नागपूर विभागातील दुर्गम व डोंगराळ भागातील आदिवासी आश्रमशाळेच्या शिक्षकांच्या ज्ञान रचनावाद पद्धतीने अभ्यासक्रमाचे उच्चीकरण, प्रश्नपत्रिकेचे पॅटर्न, शिक्षण मंडळाची गुणांकन पद्धत इत्यादी विषयांवर वेळोवेळी विस्तृतपणे विवेचन व मार्गदर्शन झाल्यामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गुणवता वाढविण्यास मदत झाली, असे त्या म्हणाल्या.

Story img Loader