परराष्ट्र मंत्रालय आणि टाटा कन्सल्टन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील नागरिकांसाठी पारपत्र विषयक सेवा अधिक सुलभ होण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. पारपत्र सेवा केंद्राच्या माध्यमातून राज्यात सुमारे पाच लाख पारपत्र वितरित करण्यात आली असून लवकरच नवीन पारपत्र सेवा केंद्र आणि लघु पारपत्र सेवा केंद्र सुरू करण्याचा विचार आहे.
राज्यात मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या चार शहरांमध्ये प्रत्येकी एक अशी चार विभागीय पारपत्र कार्यालये असून तीन सेवा केंद्रे ठाणे, पुणे व नागपूर येथे आहेत. २०१२ मध्ये सुरू झालेल्या या केंद्रातून एका वर्षांत ६ लाखांहून अधिक पारपत्रांसाठी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ३१ मार्च २०१३ पर्यंत ५ लाख पारपत्रे वितरित करण्यात आली. महाराष्ट्रातून पारपत्रांसाठी दररोज ४,६०० हून अधिक अर्ज येतात, अशी माहिती पारपत्र सेवा केंद्राचे सहसचिव आणि मुख्य पारपत्र अधिकारी मुक्तेश परदेशी यांनी दिली.
ज्या अर्जदारांना भेटीची वेळ घेणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी विविध विभागात ‘वॉक इन’ सुविधा, अपुरी कागदपत्रे असल्याने परत पाठविलेल्या अर्जदारांसाठीही ‘वॉक इन’ सुविधा, तात्काळ परिस्थितीत किंवा भेट मिळणे शक्य नसलेल्या अर्जदारांना ‘आरओपी’मध्ये सुलभ संपर्क, आठवडय़ाच्या सुट्टीच्या दिवशी पारपत्र मेळाव्याचे आयोजन आदी उपाययोजना केल्या जाणार आहेत.
या पारपत्र सेवाकेंद्राच्या कार्यालयीन वेळ आता सकाळी साडेनऊ ते दुपारी सव्वाचापर्यंत अशी करण्यात आली आहे. १७ भाषांमध्ये दिवसाचे २४ तास कॉल सेंटर सुरू, पारपत्र सेवा केंद्र आणि पोलीस ठाणे यांच्यात इलेक्ट्रॉनिक जोडणी आदी सुविधाही उपलब्ध करून दिल्या असल्याचेही परदेशी यांनी सांगितले.

Story img Loader