माण तालुक्यातील आंधळी येथील विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी केलेले वक्तव्य हा वडीलकीच्या नात्याने दिलेला सल्ला होता. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांना संपवण्याची भाषा करण्यापेक्षा एकमेकांचा सन्मान करून आगामी निवडणुका एकत्र लढण्याचे नियोजन करावे हा त्यांचा हेतू होता. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण करू नये, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की डॉ. पतंगराव कदम यांनी कोणास उद्देशून नव्हे तर मार्मिक बोलून लोकांना आपली भूमिका पटवून सांगताना दोन्ही पक्षांना उद्देशून उदाहरण दिले होते. वास्तविक आजवर विधानसभा व लोकसभा निवडणुका दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढविल्या आहेत. त्यात सातारा जिल्ह्यात मोठे यश प्राप्त झाले आहे. विधानसभेची एक जागा वगळून सर्व जागा राष्ट्रवादीकडे आहेत. आम्ही सुरुवातीपासून आघाडीचा धर्म पाळला आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे माढय़ातून उभे असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या आदेशानुसार मी स्वत: पुढाकार घेऊन जिल्हा मध्यवर्ती बँकेत लक्ष्मणराव पाटील, रामराजे निंबाळकर, शशिकांत शिंदे, जयकुमार गोरे यांच्या बैठक होऊन गोरे यांनी आपली संपूर्ण ताकद शरद पवार यांच्या पाठीमागे उभी केली. मात्र, नंतरच्या काळात जयकुमार गोरे यांनाच लक्ष्य केले जात आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात शशिकांत शिंदे व आपण स्वत: सभा घेऊन एकत्रित काम केले. भविष्यातही चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. एकमेकांना संपवण्याची भाषा करू नका. दगड रात्रीचा व दिवसाचाही मारू नका. आघाडी धर्माचे पालन करण्याची नैतिक जबाबदारी सर्वानी स्वीकारुया, असे आवाहनही आनंदराव पाटील यांनी केले आहे.

Story img Loader