भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षनिवडीनंतर प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेनेही जोर पकडला आहे. आमदार देवेंद्र फडणवीस यांचे नाव चर्चेत असतानाच मुंडे गटाकडून पाशा पटेल यांच्या नावाचीही ‘पेरणी’ केली जात आहे. राजकीय पटलावर या नावाचा खडा टाकून पाहिल्यावर काय तरंग उठतात, याची चाचपणी केली जात आहे. खासदार गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक असलेल्या पटेल यांच्या नावाच्या चर्चेमुळे प्रदेशाध्यक्षपद मराठवाडय़ाला मिळेल, असेही चित्र रंगविले जात आहे.
प्रदेशाध्यक्षपदी पांडुरंग फुंडकर, आमदार एकनाथ खडसे यांची नावे एवढे दिवस चर्चेत होती. त्यात आमदार फडणवीस यांच्या नावाची भर पडली. ते अभ्यासूपणे प्रश्न मांडतात, अशी त्यांची प्रतिमा आहे. तुलनेने योग्य मांडणी करणारा व ग्रामीण भागाशी नाळ जोडून असणारा भाजपातील फर्डा वक्ता अशी पटेल यांची ओळख आहे. अल्पसंख्य समाजाची मते पटेल यांच्यामुळे भाजपला मिळू शकतील, असा दावाही केला जात आहे. बीड लोकसभा निवडणुकीत खासदार मुंडे यांना मुस्लीम समाजाचा पाठिंबा मिळवून देण्यासाठी पटेल यांनी प्रयत्न केले होते. गटबाजीमुळे त्यांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारण्यात आली.
त्यामुळे प्रदेश संघटनेत स्थान नसलेल्या पटेल यांचे राजकीय पुनर्वसन व्हावे, या हेतूने थेट प्रदेशाध्यक्षपदासाठीच त्यांचे नाव सुचविले जात आहे. शेतकऱ्यांची भाषा बोलत सभा गाजवणारा नेता म्हणून ओळख असणाऱ्या पटेल यांच्या नावामुळे अन्य कोण उमेदवार इच्छुक आहे, हे समजणार असल्याने पटेल यांच्या नावाचाही खडा टाकून पाहिला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा