बडय़ा उद्योगपतींची पहिल्यांदाच मांदियाळी
‘अॅडव्हांटेज विदर्भ’च्या निमित्ताने देशातील ‘हाय प्रोफाईल’ बडय़ा-बडय़ा उद्योगपतींची मांदियाळी उपराजधानी पहिल्यांदाच अनुभवणार आहे. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी नाराजीची तोफ डागल्याने ‘अॅडव्हांटेज’चा डोलाराच अक्षरश: गदागदा हलला होता. आता पटेलांची नाराजी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पुढाकार घेऊन दूर केल्याने त्यांच्या हस्ते ‘अॅडव्हांटेज विदर्भ’ औद्योगिक गुंतवणूकदार परिषदेचे उद्घाटन होणार आहे. प्रफुल्ल पटेल यांनी पाठ फिरविल्याने आयोजकांची प्रचंड पंचाईत झाली होती. देशभरातील उद्योगपतींना सामंजस्य करारातील ठोस आश्वासनांच्या पूर्ती काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. आता अनिश्चिततेचे मळभ दूर झाल्याने अनेक उद्योगपतींनी या परिषदेत स्वारस्य दर्शविले असून २५ आणि २६ या दोन दिवसांच्या काळात नागपूर शहर पहिल्यांच देशातील ‘बिग शॉट’ उद्योगपतींची उपस्थिती अनुभवेल, असा अंदाज आहे.
मुख्यमंत्र्यांनी जातीने वेगवेगळ्या उद्योगपतींशी संपर्क साधून नागपुरातील औद्योगिक गुंतवणूक परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. विदर्भातील समृद्ध पर्यटन, उपलब्ध वीज, पाणी, कापूस आणि संत्रा उद्योगपतींना आकर्षित करणारे मुद्दे आहेत. विदर्भातील सद्यस्थितीतील औद्योगिक गुंतवणूक २७ हजार कोटींची असून ४५ हजार कोटींची गुंतवणूक होण्याच्या प्रतीक्षेत आहे. शिवाय अॅडव्हांटेजच्या निमित्ताने १५ हजार कोटींचे सामंजस्य करार अपेक्षित आहेत. मात्र, करारांची अंमलबजावणी एक दिव्य ठरणार आहे.  रतन टाटांचे वारसदार व टाटा समूहाचे नवनियुक्त अध्यक्ष  सायरस मिस्त्री यांच्यासह रिलायन्स समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी, रेमंड्सचे गौतम सिंघानिया, जेएसडब्ल्यू स्टील समूहाचे सज्जन जिंदाल यांच्यासह बडे उद्योगपती अॅडव्हांटेजच्या निमित्ताने नागपुरात येणार असल्याने नागपुरातील पंचतारांकित आणि त्रितारांकित हॉटेलांचीही धावपळ सुरू झाली आहे. या हॉटेलांचे बुकिंग अद्याप कंफर्म झालेले नाही. परंतु, बडय़ा उद्योगपतींनी आपल्याकडे खेचण्यासाठीची स्पर्धी तीव्र झाली आहे. नागपुरात हॉटल सन अॅण्ड सॅण्ड, रॅडिसन, तुली इम्पिरियल, प्राईड, तुली इंटनॅशनल आणि सेंटर पॉईंट या हॉटेलांपैकी एकाची उद्योगपती निवड करतील. त्यामुळे उद्योगपतींच्या व्यवस्थापनांशी हॉटेलांनी संपर्क साधून मोर्चेबांधणी केली आहे.
टाटा आणि नागपूरचे अत्यंत जुने ऋणानुबंध आहेत. टाटा समूहाचे आद्य संस्थापक जमशेदजी टाटा आणि नागपूर यांचे अत्यंत घनिष्ट नाते होते. पारसी लोकांची खास वस्ती या भागात असल्याने टाटांना याचे विशेष आकर्षण होते. नागपूरची एकेकाळची प्रख्यात एम्प्रेस मिल कामगारांना रोजगार देत होती. परंतु, मिल आणि मिलची जागा आता विकावी लागली आहे. या परिस्थितीत स्वत: टाटा जरी येणार नसले तरी त्यांचे वारसदार सायरस मिस्त्री येणार असल्याने जुन्या ऋणानुबंधांना उजाळा मिळणार आहे.

Story img Loader