आठ दिवसांत कारखाना सुरू करून शेतकऱ्यांच्या उसाला साडेतीन हजार रुपये प्रतिटन भाव द्या, कारखाना सुरू करता येत नसेल तर सोडून जा, असा इशारा आमदार मीरा रेंगे यांनी रेणुका शुगर्स प्रशासनाला दिला.
रेणुका शुगर्स कारखाना तत्काळ सुरू करावा, कापसावरील लाल्या रोगाचे अनुदान द्यावे यांसह विविध मागण्यांसाठी आमदार रेंगे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पाथरीतील सेलू कॉर्नरवर रविवारी तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे वाहतूक बंद पडली होती. रेणुका शुगर्स कारखाना २४ डिसेंबरपूर्वी सुरू न झाल्यास वेगळ्या पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. कारखाना क्षेत्रात जवळपास अडीच लाख टन ऊस उभा आहे. कारखाना बंद राहिल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे, याकडे आमदार रेंगे यांनी लक्ष वेधले.
कल्याणराव रेंगे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव, उपजिल्हाप्रमुख डॉ. संजय कच्छवे, महिला आघाडी संघटक सखुबाई लटपटे, तालुकाप्रमुख रवींद्र धम्रे, शहरप्रमुख राहुल पाटील, बाळासाहेब आरबाड, माणिक घुमरे आदी शिवसनिकांची उपस्थिती होती. उपजिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील व कारखाना प्रशासनास निवेदन देण्यात आले. आंदोलनदरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तनात होता.

Story img Loader