मालेगाव सामान्य रुग्णालयात सुरुवातीपासून क्ष-किरणतज्ज्ञ पद रिक्त असल्याने रुग्णांना प्रसूतीपूर्व काही चाचण्या असो वा काही दुर्धर आजारांविषयी आवश्यक तपासण्या यासाठी खासगी दवाखान्यांचा रस्ता धरावा लागत आहे. क्ष-किरणतज्ज्ञ नसल्याने विशेषत: महिला रुग्णांची परवड होत असून त्यांना नाहक आर्थिक भरुदडासोबत मनस्ताप सहन करावा लागत आहे.
संवेदनशील मालेगाव हे आर्थिकदृष्टय़ा काहीसे पिछाडीवर असणारे शहर म्हणून ओळखले जाते. २००८ मध्ये मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटानंतर आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा, रुग्णांची परवड लक्षात घेऊन युद्धपातळीवर २०० खाटांची सोय असलेल्या मालेगाव सामान्य रुग्णालयाची उभारणी करण्यात आली. मात्र रुग्णालयाच्या स्थापनेपासून हे रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अपुऱ्या सोयी सुविधा, औषधांचा तुटवडा, रिक्त पदे आदी कारणांनी रुग्णांच्या मनस्तापात भर पडली आहे. मालेगाव सामान्य रुग्णालयात महत्त्वाचे असणारे क्ष-किरणतज्ज्ञाचे पद सुरुवातीपासून रिक्त आहे. प्रारंभी क्ष-किरणांशी संबंधित आवश्यक यंत्रसाम्रगी नसल्याने कामात अडचण येत असल्याने हे पद भरले गेले नाही. मात्र रुग्णांच्या पाठपुराव्याने वर्षभरात ही यंत्रसामग्री मागविण्यात आली. त्यानंतर आवश्यक कुशल मनुष्यबळ भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली. यासाठी गलेलठ्ठ पगारासह आवश्यक सोयीसुविधा देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र सहा वर्षांनंतरही आरोग्य विभागाला या ठिकाणी काम करणारी व्यक्ती सापडलेली नाही. म्हणजे, शासकीय रुग्णालयात काम करण्यास फारसा कोणाला रस नसल्याचे लक्षात येते. या पदावर काम करणाऱ्याला सुमारे ४० हजार रुपये वेतन शासन देण्यास तयार आहे. मात्र, त्यासाठी कोणी इच्छुक नाही. दुसरीकडे, शहर परिसरात बीड प्रकरणानंतरही गर्भलिंग निदान चाचणीचा व्यवसाय जोमात सुरू असल्याचे सांगितले जाते. खासगी रुग्णालयात या तज्ज्ञांना भरभक्कम पैसा मिळतो. यामुळे शासकीय रुग्णालयात नोकरी करण्यात कोणाला रस नसल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी राज्य महिला आयोगाच्या सदस्या चित्रा वाघ यांनी या रुग्णालयास भेट दिली असता त्यांनी या प्रश्नावर बोट ठेवले होते. सरकारी रुग्णालयात कामाचा ताण, रुग्णांशी वेळोवेळी होणारे वाद-विवाद यामुळे हे पद रिक्त राहिल्याची शक्यता व्यक्त होत आहे.सरकारी अनास्थेमुळे पोट, पाठ, हात-पाय यासह शरीराच्या व्याधी निवारणासाठी आवश्यक ‘एक्स-रे’, प्रसूतीपूर्व काळात तसेच अन्य काही तक्रारी यासाठी रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागते. प्रसूतीपूर्व काळात काही त्रास उद्भवल्यास सरकारी रुग्णालयाऐवजी रुग्णांना खासगी व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागते. रुग्णालयात हे पद रिक्त असल्याने एक्स-रे वा सोनोग्राफीसाठी २०० ते ४००-५०० रुपयांचा भरुदड रुग्णांना सोसावा लागत आहे. रुग्णालय व्यवस्थापनाने कंत्राटी पद्धतीने काही वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करत काम सुरू ठेवले असले तरी त्यांच्या एकंदरीत कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हे पद तातडीने भरण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने दिला असला तरी नियुक्ती कधी होणार, असा प्रश्न रुग्णांना पडला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा