शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या बाह्य़रुग्ण विभागात दलाल आणि चोरांचा सुळसुळाट झाला असताना गेल्या काही दिवसात वैद्यकीय प्रतिनिधींचा वावर मेडिकल परिसरात वाढला आहे. वैद्यकीय प्रतिनिधींशी तासनतास चर्चा करण्यात व्यस्त असलेल्या रुग्णांना बाहेर रुग्ण आहेत, याचे भान राहत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुरक्षेच्या कारणावरून मेडिकल प्रशासनाने किरकोळ वैद्यकीय प्रतिनिधींना बंदी घातली असताना रुग्णसेवेत अडथळा निर्माण करणाऱ्या वैद्यकीय प्रतिनिधींचा वावर मात्र सर्रास सुरू असून याकडे मेडिकल प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
मेडिकलमध्ये सोमवार ते शनिवार पर्यंत दुपारी १२ वाजेपर्यंत डॉक्टरांची ओपीडी असल्यामुळे विविध विभागामध्ये हजारो रुग्ण तपासणी व उपचारासाठी येत असतात. प्रचंड वर्दळ असल्याने डॉक्टरांना रुग्ण तपासणीतून वेळ मिळत नाही मात्र ओपीडीची वेळ साधून वैद्यकीय प्रतिनिधी मेडिकलमध्ये येत असतात. कंपनीने बाजारात आणलेल्या नवीन औषधांबाबत डॉक्टरांना माहिती देण्याचा त्याचा उद्देश असला तरी ते चुकीच्या वेळेत येत असल्याने त्याचा फटका मात्र गरीब रुग्णांना बसतो. ‘ओपीडी’नंतर डॉक्टर वैद्यकीय प्रतिनिधींना भेट नाही त्यामुळे रुग्णांची तपासणई करीत असताना वैद्यकीय प्रतिनिधी डॉक्टरांच्या कक्षात शिरतात. एकीकडे रुग्ण उपचाराच्या प्रतिक्षेत बाहेर असताना दुसरकडे कक्षामध्ये डॉक्टर संबधित वैद्यकीय प्रतिनिधींशी चर्चा करण्यात व्यस्त असतो. कंपनीने बाजारात आणलेल्या नवीन औषधांची माहिती डॉक्टरांना दिली जात असतात त्यावर डॉक्टरही त्याच्याशी तासनतास चर्चा करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मेडिकलमध्ये या संदर्भात अनेक रुग्णांनी डॉक्टरांशी चर्चा केली मात्र, त्यांना थोडावेळ थांबा असे सांगून तासनतास बसविले जात असल्याच्या तक्रारी रुग्णांनी केल्या. डॉक्टराच्या कक्षाबाहेर असलेला चपराशी डॉक्टर बिझी असल्याचे सांगून रुग्णांना आतमध्ये सोडत नाही. कंपन्याकडून महागडय़ा भेटवस्तू मिळत असल्याने डॉक्टर रुग्णांकडे दुर्लक्ष करून वैद्यकीय प्रतिनिधींना जवळ करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मेडिकलच्या विविध वॉर्डामध्ये बाहेरील चहावाले, कपडे, साबण, टूथपेस्ट, विक्रते वस्तूंची विक्री करतात. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मेडिकल प्रशासनाने चिल्लर विक्रेत्यांची दुकानदारी बंद केली असताना हा प्रकार सर्रास सुरू आहे. मेडिकलमध्ये दररोज विविध कंपन्याचे शंभरच्या वर वैद्यकीय प्रतिनिधी रुग्णसेवेत बाधा पोहचवित असताना मेडिकल प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
या संदर्भात मेडिकलचे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. वासुदेव बारसागडे म्हणाले, वैद्यकीय प्रतिनिधींनी अओपीडीच्या वेळेत येणे चुकीचे असून यापुढे त्यांना वेळ ठरवूीन दिली जाणार आहे. जे डॉक्टर रुग्णसेवा करीत असताना वैद्यकीय प्रतिनिधींना तासनतास घेऊन बसत असतील तर त्यांच्यावर प्रशासनातर्फे लक्ष ठेवले जाईल. डॉक्टरांना निर्देश देण्यासाठी विभागप्रमुखांना सूचना करण्यात येईल आणि त्यानंतर मेडिकल प्रतिनिधींचा वावर वाढला तर संबधीतांवर कारवाई करण्यात येईल असेही डॉ. बारसागडे म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा