शहरातील शासकीय रुग्णालयांच्या तुलनेत महापालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या अत्यल्प आहे. पुरेशा सोयी उपलब्ध नसल्याने रुग्णांनी महापालिकेच्या रुग्णालयाकडे पाठ फिरविली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) बाह्य़रुग्ण विभागात एका दिवशी सरासरी पंधराशे, तसेच इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) बाह्य़रुग्ण विभागात सरासरी आठशे रुग्णांची तपासणी केली जात असताना महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयातील बाह्य़रुग्ण विभागात एका दिवशी सरासरी ६५ ते ७० रुग्ण तपासणी करून घेत असल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात २०११ मध्ये २४ हजार ३११, २०१२ मध्ये २३ हजार ८६६, २०१३ मध्ये २२ हजार ५२३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. तर २०१४ मध्ये ३० जूनपर्यंत १२ हजार ५३३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. तर २०११ मध्ये १०९७, २०१२ मध्ये ६६९, २०१३ मध्ये ८९३ रुग्णांना दाखल करून घेण्यात आले. तर यावर्षी ३० जूनपर्यंत फक्त ३३८ रुग्ण दाखल झाले होते. तसेच २०११ मध्ये ५, २०१२ आणि २०१३ मध्ये प्रत्येकी दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना माहिती अधिकार कायद्यांतर्गत ही माहिती प्राप्त झाली आहे.
२०११ मध्ये महापालिकेने या रुग्णालयासाठी २० लाख रुपयांची तरतूद केली होती. परंतु त्यातील फक्त ४ लाख ८९ हजार ७५९ रुपयेच खर्च झाले. २०१२ मध्ये १५ लाखांची तरतूद करण्यात आली होती, त्यातील ५ लाख ७४ हजार ३४६ हजार खर्च झाले. २०१३ मध्ये २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असताना त्यातील फक्त ६ लाख ३२ हजार ०८२ रुपयेच खर्च झाले. तरतूद करूनही अत्यल्प खर्च होत असल्याने २०१४ साठी फक्त १० लाखांचीच तरतूद करण्यात आली आहे. रुग्णालयात दोन लाख रुपये किमतीपेक्षा अधिक किमतीचे एकही यंत्र उपलब्ध नसल्याची माहितीही एका प्रश्नाच्या उत्तरात देण्यात आली.
रुग्णालयात पाच स्थायी सफाई कामगार आणि ९नऊ सफाई ऐवजदार आहेत. हे १४ कर्मचारी आळीपाळीने दिवसांतून तीन वेळा रुग्णालयाची स्वच्छता करतात. या रुग्णालयामध्ये सात वैद्यकीय अधिकारी, एक शस्त्रक्रिया तज्ज्ञ, दोन यू.डी.सी., १७ परिचारिका, एक ईसीजी तंत्रज्ञ, एक औषध तंत्रज्ञ, एक कम्पाऊंडर, एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक डार्करुम तंत्रज्ञ, १२ अटेंडन्ट एवढे कर्मचारी व अधिकारी आहेत. या रुग्णालयात मिळणाऱ्या आरोग्य सेवेबाबत एकाही रुग्णाने तक्रार केली नाही. शिस्तभंग केल्यावरून कोणत्याही कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात आली नाही. तसेच गेल्या साडेतीन वर्षांत एकही कर्मचारी गैरव्यवहारात सापडला नसल्याची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महापालिकेच्या रुग्णालयात अद्यावत यंत्रसामुग्री उपलब्ध नसणे, विविध शाखेतील तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध राहात नसल्याने शहरातील नागरिक उपचारासाठी जात नसल्याचे स्पष्ट होते. यामुळे मेडिकल व मेयोवर अतिरिक्त भार पडत आहेत. मंजूर खाटांपेक्षा अधिक रुग्ण दाखल राहात असल्याने मेडिकल आणि मेयोतील रुग्ण सेवेत गुणवत्ता राहात नाही. अपेक्षेपेक्षा अधिक होत असलेल्या रुग्णांच्या गर्दीमुळे डॉक्टर व रुग्ण संघर्ष घडण्यामागे हेही एक कारण सांगितले जाते. मुंबई प्रमाणेच महापालिकेने मोठे रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे, पण त्याकडे महापालिका लक्ष देत नसल्याचे दिसून येते.
महापालिकेच्या रुग्णालयाकडे रुग्णांची पाठ
शहरातील शासकीय रुग्णालयांच्या तुलनेत महापालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या अत्यल्प आहे. पुरेशा सोयी उपलब्ध नसल्याने रुग्णांनी महापालिकेच्या रुग्णालयाकडे पाठ फिरविली आहे.
First published on: 30-08-2014 at 02:08 IST
TOPICSरुग्ण
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Patients ignoring municipal hospitals due to shortage of facility