मेडिकल महाविद्यालय व रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून कोटय़वधी रुपयांचा निधी दिला जात असतानाही पावसाळ्यामध्ये अनेक विभागांमध्ये पाणी गळत असल्यामुळे कोटय़वधी रुपयांची उपकरणे धोक्यात आली असून यामुळे बांधकाम विभागाच्या कामकाजावर प्रश्न निर्माण झाले आहे. सोमवार आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने तर मेडिकलच्या अतिदक्षता विभाग, प्रसूती विभाग, बालरोग आणि रेडिओलॉजी विभागात पाणी साचल्याने रुग्णांचे अतोनात हाल झाले.
मंगळवारी झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या २ कोटीची गुंतवणूक असलेल्या आपत्कालीन विभागाला बसला आहे. मेडिकलच्या अतिदक्षता विभागातील रुग्णांना मध्यरात्रीनंतर दुसऱ्या वॉर्डात हलविण्यात आले. सांडपाणी वाहून जाण्यासाठी केलेल्या नाल्या तुंबल्या असून तेथे कचरा देखील टाकला जातो. परिणामी ही परिस्थिती उद्भवली. मात्र, प्रभावी उपाययोजनची अंमलबजावणी मेडिकल प्रशासनाकडून होताना दिसून येत नाही. शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या आकस्मिक विभागासमोर साचलेले तळे दुर्लक्षाची साक्ष देणारे आहे. काही विभागात आणि वॉर्डांमध्ये पाणी गळत आहे. संततधार पावसाने अनेक विभागाच्या भिंतीमध्ये ओलावा आला असून त्यामुळे महत्वाच्या फाईली खराब झाल्या आहेत. अनेक वॉर्डामध्ये पाणी शिरल्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागला. प्रसूती विभागात खाटा कमी आणि प्रसूतीसाठी आलेल्या महिलांची संख्या जास्त त्यामुळे अनेक महिलांना जमिनीवर जागा करून देण्यात आली होती. त्यांना तात्काळ दुसऱ्या वार्डात हलविण्यात आले.
 अनेक विभागातील भिंतीमध्ये ओलावा आल्याने त्यात विद्युत प्रवाह येऊन मोठय़ा दुर्घटनेची शक्यता असून याकडे सार्वजानिक बांधकाम विभाग आणि मेडिकल प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप सर्वसामान्य रुग्णांनी केला. मेडिकलमधील अनेक विभागाच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. नवीन इमारतीचे काम सुरू आहे मात्र, ते केव्हा पूर्ण होईल, ते सांगता येत नाही. पावसाळ्यात पाणी गळू नये किंवा भिंतीमध्ये ओलावा येऊ नये यासाठी अनेक विभागाच्या छताची दरवर्षी दुरस्ती केली जाते. त्यासाठी मोठा खर्च केला जातो तरीही अनेक विभागांमध्ये पाणी गळतीचे प्रमाण कमी झालेले नाही.
पावसाळ्याच्या दिवसात प्रशासन पातळीवर अनेक समस्या असताना प्रशासन विभागातील अधिकारी आणि अधिष्ठात्यांनी वॉर्डाकडे फेरफटका मारणे बंद केल्यामुळे याकडे कोणीच लक्ष देत नाही. या संदर्भात मेडिकलच्या प्रशासनाकडे तक्रार येत असल्या तरी त्या गांभीर्याने घेतल्या जात नाहीत. मेडिकलच्या इमारत दुरस्ती व देखभालीची जबाबदारी सार्वजानिक बांधकाम विभागाकडे असल्यामुळे मेडिकल प्रशासनाने ती आमची जबाबदारी नाही असे सांगून हात झटकले आहेत.
दोन महिन्यापूर्वी मेडिकल स्वच्छतेसंदर्भात वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद कुळकर्णी यांनी प्रशासनाला सूचना केल्या, पण, त्या सूचनांचे पालन झाले नाही. या सर्वाचा त्रास मात्र रुग्णांना भोगावा लागत आहे.

Story img Loader