गर्भवती महिलेला तातडीने वैद्यकीय सेवा मिळावी या हेतूने सुरू करण्यात आलेल्या १०८ या हेल्पलाइन क्रमांकावर रुग्ण नातेवाइकांनी संपर्क केल्यानंतर त्यांना प्रतीक्षा, पश्चात्ताप आणि संताप याच गोष्टींना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. डोंबिवली, उल्हासनगर परिसरांतील नागरिकांना याचा कटू अनुभव येत आहे. राज्य शासनाने सुरू केलेल्या या उपक्रमातील अनागोंदीची तक्रार करायची कोठे या विवंचनेत रुग्ण नातेवाईक आहेत. मुंबई परिसरातील रुग्णांनी, असे अनुभव यापूर्वी घेतले आहेत. हे लोण आता कल्याण परिसरात पसरले आहे.
ऐन दिवाळीच्या दिवशी उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील एका परिचारिकेला प्रसूती वेदना सुरू होत्या. तिचा रक्तदाब वाढला होता. सकाळी साडेसात वाजता या महिलेला मध्यवर्ती रुग्णालयात आणण्यात आले.
स्थानिक डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर या महिलेला शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी महिलेच्या नातेवाईकांना दिला. तात्काळ १०८ हेल्पलाइनवर संपर्क करण्यात आला. अध्र्या तासाने एक डॉक्टर रुग्णालयात हजर झाले. रुग्णवाहिका उपलब्ध होती. आपण रात्रपाळी केली आहे. शीव येथे आपण जाऊ शकत नाही असे तुणतुणे १०८ हेल्पलाइनच्या संपर्काने आलेल्या डॉक्टरने वाजवण्यास सुरुवात केली.
आपल्या बदल्यात पावणे दहा वाजता येणारी महिला डॉक्टर शीवला जाईल, असे तो डॉक्टर सांगू लागला. तातडीने शीव येथे जाण्यासाठी अडथळा नको म्हणून गर्भवती महिलेला रुग्णालयाच्या दारात आणून ठेवण्यात आले होते. पावणे दहा वाजता एक महिला डॉक्टर रुग्णालयात आली. तिने आपण शीव येथे जाणार नाही असा पवित्रा घेतला.
१० ते १५ मिनिटे ती रुग्णवाहिकेजवळ भ्रमणध्वनीवर बोलत होती. तिने रुग्णवाहिके बरोबर न जाण्याचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे १०८ क्रमांकाच्या संपर्कामुळे उपलब्ध असलेली रुग्णवाहिका जागची हलणार नाही. सकाळी साडेसात ते दहा वाजेपर्यंत रुग्णालयात डॉक्टरांची चाललेली मनमानी पाहून गर्भवती महिलेच्या नातेवाइकांनी खासगी रुग्णवाहिका करून शीवचे रुग्णालय गाठले. तेथे गर्भवती महिला सुखरूप बाळंतीण झाली, असे मध्यवर्ती रुग्णालयातील कर्मचाऱ्याने सांगितले. गर्भवती महिलेला शीव येथे नेण्यास टाळाटाळ करणाऱ्या दोन्ही डॉ्रक्टरांवर संबंधित संस्थेने कारवाई केल्याचे बोलले जाते.
डोंबिवलीतील नगरसेविका मनीषा धात्रक यांनाही १०८ क्रमांकाचा असाच अनुभव आला. एका गर्भवती महिलेला तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी त्यांनी १०८ क्रमांकावर संपर्क साधला. तेथे धात्रक यांची वीस मिनिटे मुलाखत घेण्यात आली. रुग्ण कोठे आहे. त्याचे नाव, पत्ता आदी गोष्टी विचारून घेतल्या. त्यानंतर अध्र्या तासाने रुग्णवाहिका उपलब्ध नाही असे मनीषा धात्रक यांना सांगण्यात आले.
शासनाने महिलांच्या सेवेसाठी हा उपक्रम सुरू असला तरी स्थानिक पातळीवर त्यांचे कर्मचारी या योजनेचा बोजवारा उडवत आहेत, अशी टीका नगरसेविका धात्रक यांनी केली. १०८ क्रमांकाची एजन्सी चालवणाऱ्या संस्थेशी भ्रमणध्वनीवर सतत संपर्क करूनही प्रतिक्रियेसाठी कोणीही उपलब्ध झाले नाही.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा