जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमश्रेणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची १५ पदे रिक्त असून प्रसूती तज्ज्ञ नसल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दलालांकडून होणारी आर्थिक लूट व डॉक्टरांच्या खाबुगिरीमुळे रुग्ण त्रस्त झाले आहेत. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या रुग्णालयाची अवस्था वाईट झाली आहे.
हा जिल्हा २४ लाख लोकसंख्येचा असून औद्योगिकीदृष्टय़ा भरभराटीला आल्याने येथे कामगारांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. कामगारांसाठी तालुका पातळीवर ग्रामीण रुग्णालय, तसेच जिल्हास्तरावर जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. यासोबतच ग्रामीण भागातील आर्थिकदृष्टय़ा मागास प्रवर्गासाठीही जिल्हा सामान्य रुग्णालयाची सुविधा आहे. मात्र, गरीब रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार होत नसल्याची व त्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याची बाब समोर आली आहे. ३०० खाटांच्या या शासकीय रुग्णालयात प्रथमश्रेणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची १५ पदे रिक्त आहेत. अस्थी रोगतज्ज्ञ, प्रसूतीतज्ज्ञ, बाल रोगतज्ज्ञ, नेत्र व कान, नाक घसा तज्ज्ञांपासून तर सर्व विभाग प्रमुखांच्या जागा जवळपास पाच ते सहा वर्षांंपासून रिक्तच आहेत. या जागा तातडीने भरण्यात याव्या, अशी मागणी वारंवार होत असली तरी उदासीन लोकप्रतिनिधींमुळे या जागा आजवर भरल्याच गेल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कंत्राटी पध्दतीने डॉक्टरांची भरती करून त्यांच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातही रुग्णालय परिसरात खासगी डॉक्टरांचे दलाल सक्रीय असून त्यांच्या माध्यमातून गरीब रुग्णांची आर्थिक पिळवणूक सुरू आहे. दलालांच्या माध्यमातून रुग्णांना गाठायचे व त्यांना खासगी रुग्णालयात घेऊन जायचे. तेथे त्याच्यावर उपचार केल्यानंतर अव्वाच्या सव्वा पैसे उकळायचे, असा हा प्रकार सुरू आहे. जिल्हा शल्यचिकित्सक सोनुने यांचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. विदर्भात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पदे रिक्त असलेला हा एकमेव जिल्हा आहे. केवळ जिल्हा रुणालयातच नाही, तर प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयांची अवस्थाही इतकीच वाईट झालेली आहे. तालुका पातळीवर वैद्यकीय अधिकारी राहात नसल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात रुग्णांना घेऊन यावे लागते. मात्र. इथेही तशीच अवस्था झालेली असल्याची ओरड आता रुग्णांनी सुरू केली आहे. शासकीय रुग्णालयात एक्स-रे मशिनपासून तर सिटीस्कॅन व इतर सर्व महत्वपूर्ण यंत्रणा बंद पडली आहे. उपचारासाठी येणारे रुग्ण अभ्यागत समितीकडे तक्रारी करतात परंतु. रुग्णालयाची अभ्यागत समितीही कुचकामी ठरली आहे.