शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दाट मैत्री. मैद्याचे पोते किंवा बारामतीच्या म्हमद्या, असा उल्लेख बाळासाहेब पवारांबाबत करायचे, पण पवार फारसे मनावर घ्यायचे नाहीत. १९९० च्या दशकात राज्यात शिवसेना वाढीस लागल्यावर शिवसेनेला रोखले पाहिजे, असा काँग्रेसमध्ये सूर होता. त्यातूनच दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी ठाकरे यांच्या विरोधात कारवाईचा आदेश तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना दिला होता. पण पवारांनी तेव्हा कारवाई करण्याचे टाळले होते.
१९८६ मध्ये पवार यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला. तेव्हा विरोधकांची निर्माण झालेली पोकळी शिवसेनेने भरून काढली. १९९०च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेससमोर तेव्हा शिवसेनेचे आव्हान उभे ठाकले होते. शिवसेनेचा बंदोबस्त केला पाहिजे, असा काँग्रेसमध्ये तेव्हा सूर होता. ठाणे महापौर निवडणुकीत शिवसेनेत फाटाफूट झाली आणि काँग्रेसचा महापौर निवडून आले. शिवसेनेच्या साऱ्या नगरसेवकांचे राजीनामे घेण्यात आले. गद्दारांना क्षमा नाही, अशी मुलाखत तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी दिली होती. थोडय़ाच दिवसांत श्रीधर खोपकर या सेनेच्या माजी नगरसेवकाची हत्या झाली. आनंद दिघे यांच्यासह काही जणांना ‘टाडा’ खाली अटक झाली. या हत्येचे सूत्रधार म्हणून शिवसेनाप्रमुखांना आरोपी करावे, असा काँग्रेसमध्ये मतप्रवाह होता. दिल्लीतील नेत्यांनी तेव्हा हिरवा कंदिल दाखविला होता. तत्कालीन गृहराज्यमंत्री रोहिदास पाटील हे दिल्लीच्या आदेशानुसार शिवसेनाप्रमुखांना अटक करावी म्हणून पवारांकडे गेले. खुनाच्या आरोपावरून ठाकरे यांना अटक झाल्यास सहानभूती निर्माण होणार नाही, असा काँग्रेसमधील सूर होता.
शिवसेनाप्रमुखांच्या विरोधात कारवाई करण्याच्या भानगडीत पडू नका, उगाचच वातावरण पेटेल आणि ते आटोक्यात आणणे कठीण जाईल, असा सल्ला पवार यांनी तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांना दिला होता. पवार यांनी कारवाई करण्याचे टाळले होते. अशा रितीने पवार यांनी तेव्हा शिवसेनाप्रमुखांची अटक टाळली होती. नेमके पवार यांच्या पक्षाचे गृहमंत्री छगन भुजबळ यांनी मात्र शिवसेनाप्रमुखांना अटक करण्याचे धाडस दाखविले. अर्थात ही कारवाई करण्यापूर्वी पवार यांना पूर्वकल्पना दिली नव्हती, अन्यथा असे सांगत भुजबळ यांनी मध्यंतरी एका कार्यक्रमात बोलताना अटक शक्य झाली नसती, असाच सूचक उद्गार काढले होते.

Story img Loader