‘पूर्ती’च्या घोटाळ्याचे शिंतोडे अंगावर उडाल्याने नितीन गडकरी ‘माजी’ राष्ट्रीय अध्यक्ष बनून नागपुरात परतल्यानंतर त्यांनी अ‍ॅग्रोव्हिजनचे निमित्त साधून  विदर्भातील जनसंपर्काची पायाभरणी सुरू केली आहे. गडकरींचे अध्यक्षपद गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची तीन दिवसांची विदर्भ भेट आणि भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांच्या झंझावाती नागपूर व ब्रम्हपुरी दौऱ्याने विदर्भाचे राजकारण ढवळून निघाले आहे. राजकीय विचारांच्या मतभेदांपलीकडे ‘मैत्र’ जपणाऱ्या या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केल्याचेच संकेत या दौऱ्यांमधून मिळाले आहेत.
गडकरी नागपुरातून २०१४ सालची लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे निश्चित झाल्याने सावध झालेल्या नागपूरच्या काँग्रेस नेत्यांनी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या निवासस्थानी खास गडकरी विरोधी बैठक घेऊन एकोप्याची नांदी दिली. भाजपला गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत उल्लेखनीय यश मिळवून देण्यात गडकरी यशस्वी झाले होते. त्यामुळे त्यांच्या रणनितीला चोख उत्तर देण्याची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन नागपूर गाठताच गडकरींनी आयकर खाते आणि काँग्रेसवर तोफ डागून संघर्षांचे संकेत दिले. लोकसभा निवडणूक लढवू आणि जिंकून दाखवू, असे जाहीर करून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले. नेमका दोन दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा तीन दिवसांचा बहुचर्चित विदर्भ दौरा भाजपला अस्वस्थ करून गेला. गेल्यावर्षीच डिसेंबरमध्ये पवार विदर्भात येणार होते परंतु, काही कारणास्तव त्यांनी हा दौरा रद्द केल्याने राष्ट्रवादीत नैराश्येचे वातावरण होते. पवारांनी तीन दिवसांच्या दौऱ्यात पक्षाच्या निवडक नेत्यांबरोबर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा केली. राजकीय अनिश्चितता निर्माण करणारे विधान करण्यात ‘तज्ज्ञ’ असलेल्या पवारांचे ‘युपीएसोबतच निवडणूक लढवू मात्र लोकसभेतील विजयाबाबत शंका वाटते’  या विधानाने काँग्रेसमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले.
भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांचे गडकरींचा गृहजिल्हा असलेल्या नागपुरात कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत करून राजनाथसिंहांशी वावडे नसल्याचे दाखवून दिले. खुद्द गडकरी राजनाथसिंह यांच्या स्वागतासाठी आघाडीवर होते. राजनाथसिंहांचे नाव गडकरींनीच सुचविले होते. अ‍ॅग्रोव्हिजनला शेतकऱ्यांनी दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद आणि ब्रम्हपुरीच्या विशाल शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने भाजपने विदर्भातील शेतकरी मतदारांमध्ये स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्यात तात्पुरते यश मिळविल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा